प्रशांत चंदनखेडे वणी
शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कृष्णापूर येथिल रहिवाशी असलेल्या नामदेव दादाजी लांडे या शेतकऱ्याची शेतात बांधून असलेली बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यांनी याबाबत शिरपूर पोलिस सेटशनला तक्रार नोंदविल्यानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे ठाणेदार माधव शिंदे यांनी अवघ्या २४ तासांत या चोरी प्रकरणाचा छडा लावला. आपल्या कौशल्यपूर्ण तपासातून त्यांनी शेतकऱ्याची बैलजोडी चोरी करणाऱ्या चोरट्याला गजाआड केले. त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बैलजोडी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीत सहभागी असलेले त्याचे दोन साथीदार पिकअप (MH २९ BE ६९३२) मध्ये बैलजोडी घेऊन भंडाऱ्याला गेले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्या कबुली जबाबावरून ठाणेदार माधव शिंदे यांनी रात्रीच भंडाऱ्याला पोलिस पथक रवाना केले. पोलिस पथकाने भंडारा येथून बैलजोडी किंमत १ लाख २० हजार रुपये व गुन्हयात वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपी भोलाराम पडोळे व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
सादर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार माधव शिंदे, पोउपनि रावसाहेब बुधावत, पोहवा गंगाधर घोडाम, नापोकॉ गजानन सावसाकडे, चालक पोकॉ विजय फुल्लुके यांनी केली.

No comments: