शेलू (खु.) गावाजवळील नाल्यात आढळला युवकाचा मृतदेह, दुचाकीसह नाल्यात कोसळल्याचा बांधला जात आहे अंदाज
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील शेलू (खु.) गावाजवळ असलेल्या नाल्यात एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना सोमवार दि. १६ सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली. उमेश मारोती सातपुते (३५) रा. शेलू (खु.) असे या मृतक युवकाचे नाव आहे. उमेश हा दुचाकीने जात असतांना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो दुचाकीसह पुलावरून खाली पडला असावा, असा कयास वर्तविण्यात येत आहे.
शेलू (खुर्द) येथे वास्तव्यास असलेला उमेश सातपुते हा युवक १५ सप्टेंबरला रात्री १० वाजता दुचाकीने घरून बाहेर पडला. दरम्यान नांदेपेरा मार्गावर असलेल्या नाल्यावरील पुलावरून खाली कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. १५ सप्टेंबरला गावात गणपती जवळ जेवणाचा कार्यक्रम होता. उमेशनेही तेथे जेवन केले. जेवण केल्यानंतर रात्री १० वाजता तो काही कामानिमित्त जातो म्हणून दुचाकी घेऊन निघाला. नांदेपेरा मार्गावरील नाल्याच्या पुलावरून जात असतांना त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले व तो दुचाकीसह नाल्यात कोसळला, असा कयास वर्तविण्यात येत आहे. उमेश हा दुचाकीसह नाल्यात कोसळल्याने त्याला जबर मार लागला. तसेच रात्रभर तो नाल्यातच पडून राहिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी गावातीलच काही लोकांना दुचाकी व युवक नाल्यात पडून असल्याचे आढळले. नंतर ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. घटनास्थळी बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली. अशातच पुलात पडून असलेला युवक हा उमेश सातपुते असल्याचे बघणाऱ्यांच्या लक्षात आले. नंतर ही माहिती त्याच्या कुटुंबियांना व पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शेलू (खु.) गावाजवळील नाल्यावर असलेला हा पूल अरुंद असून युवकाचं संतुलन बिघडल्याने तो दुचाकीसह नाल्यात कोसळल्याची चर्चा गावातून ऐकायला मिळत आहे. उमेश सातपुते याच्या पश्च्यात आई वडील, पत्नी व दोन लहान मुली असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment