शिरपूर प्रवासी निवाऱ्याजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी, मालवाहू वाहतुकीमुळे हा मार्ग झाला आहे धोकादायक
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी कोरपना मार्गावरील शिरपूर या गावातील प्रवासी निवाऱ्याजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वणी कोरपना हा मार्ग नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. या मार्गाने दिवसरात्र कोळशाची वाहतुक सुरु असते. तसेच डोलोमाइट, सिमेंट व अन्य खनिजांचीही वाहतूक करणारी वाहने या मार्गाने सुसाट धावतात. अवजड वाहनांच्या दळणवळणाचा हा मार्ग असून या मार्गाने मालवाहू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते. मालवाहू वाहतुकीच्या सुसाट वाहनांमुळे या मार्गावर नेहमी अपघाताचा धोका उद्भवलेला असतो. वणी कोरपना मार्गावरील शिरपूर या गावातूनही खनिजांची वाहतूक करणारी ही वाहने भरधाव जाणे येणे करीत असल्याने गावातील नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग धोकादायक ठरू लागला आहे. शिरपूर येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नेहमी बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे प्रवासी निवाऱ्याजवळ विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्याचबरोबर प्रवाशांचंही याठिकाणी सतत जाणं येणं सुरु असते. प्रवासी निवाऱ्यावर प्रवाशांची व विद्यार्थ्यांची असणारी वर्दळ लक्षात घेता प्रवासी निवाऱ्याजवळ गतिरोधक बसविणे अतिशय जरुरी झाले आहे. येथे गतिरोधक नसल्याने मालवाहू वाहने प्रवासी निवाऱ्याजवळूनही भरधाव जातात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना या मालवाहू वाहनांमुळे कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये याकरिता शिरपूर प्रवासी निवाऱ्याजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देतांना फाल्गुन गोहोकार यांच्यासह मनसेचे अंकुश बोढे, विजय चोखरे, गणेश गोहोकार, सुरज काकडे, शिक्षक लोहे, खिरटकर, उरकुडे, शिक्षिका सोनटक्के तथा शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment