रस्त्यावरील खड्ड्यांत बेशरमाची झाडे लावून संजय खाडे यांनी केलं अनोखं आंदोलन

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यातील अनेक रस्ते आजही दयनीय अवस्थेत असून रस्त्यांवर तयार झालेल्या खड्ड्यांमुळे रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे छोट्या वाहनधारकांचे वाहने चालविणे कठीण झाले आहे. खानबाधित क्षेत्रातील रस्त्यांची तर अतिशय बिकट अवस्था झाली आहे. ग्रामीण भागातील रस्तेही रहदारी योग्य राहिलेले नाही. अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नव्याने बांधण्यात आलेले रस्तेही अल्पावधीतच उखडू लागले आहेत. ग्रामीण भागाला जोडणारे काही रस्ते तर शेवटची घटका मोजू लागले आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष अनाकलनीय आहे. रस्त्यांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली असतांनाही रस्त्यांची दुरुस्ती करण्याची तसदी घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालवितांना नागरिकांना होणारा त्रास व त्यांना सहन करावा लागणारा मनःस्ताप तसेच त्यांच्या व्यथा ऐकून काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी भालर रोडवर नागरिकांसोबत आंदोलन केले. रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी आपला रोष व्यक्त करतांनाच सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. 

तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणारे रस्ते आजही दयनीय अवस्थेतच आहेत. या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली असतांनाही त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करतांना नागरिकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहे. काही रस्ते पूर्णपणे उखडले असल्याने या रस्त्यांनी मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना धुळीच्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर ठिकठिकांणी मोठमोठे खड्डे तयार झाल्याने छोट्या वाहनधारकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ते विकासाकरिता कोट्यवधींचा निधी मिळूनही तालुक्यातील रस्त्यांची समस्या अजूनही सुटली नाही. लालगुडा-उकनी, चारगाव-शिरपूर-शिंदोला, शिंदोला-येनक, वेळाबाई-मोहदा-कृष्णानपूर, १८ नंबर पूल-वरझडी-मेंढोली हे त्यापैकी काही मार्ग आहेत, ज्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची बांधकाम विभागाकडून जराही तसदी घेण्यात आली नाही. या रस्त्यांवर नेहमी छोटे मोठे अपघात घडत आहेत. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाषाणव्ह्रदयी अधिकाऱ्यांना पाझर फुटल्याचे दिसत नाही. 

कोळसाखानीकडे जाणाऱ्या रस्त्यांची तर पार वाट लागली आहे. खान बाधित क्षेत्रातील गावांमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना रस्त्यांनी मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. नव्याने बांधलेले रस्ते अल्पावधीतच उखडू लागले आहेत. अवजड वाहनांचा भार उचलणारे रस्ते बांधण्यात न आल्याने ते अल्पावधीतच दम तोडू लागले आहेत. वणी-मुकुटबन मार्गावरही खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण होऊ लागलं आहे. या रस्त्यावरील डांबर उडून गीट्टी दिसू लागली आहे. तालुक्यातील काही रस्ते तर शेवटची घटका मोजू लागले आहेत. पण त्यांच्या दुरुस्तीचा मुहूर्त मात्र अद्याप निघाला नाही. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. नागरिकांचा सातत्याने या रस्त्यांनी प्रवास सुरु असतो. शेतकरी, खाजगी व शासकीय कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी व गर्भवती महिलांना या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करतांना मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहे. काही रस्ते अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहेत. तर काही रस्त्यांवर कधी डांबर पडलेच नाही. तर काही रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. त्यामुळे कुंभकरणी झोपेत असलेल्या सा.बां.विभागाला जागे करण्याकरिता राज्य कापूस पणन महासंघाचे संचालक व जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय खाडे यांनी भालर मार्गावर नागरिकांसोबत आंदोलन केले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. 

या आंदोलनात संजय खाडे यांच्या सोबत अशोक चिकटे, अरुण चटप, प्रमोद लोणारे, रवि कोटावार, तेजराज बोढे, निकेश पानघाटे, प्रफुल उपरे, कुचनकर, कैलास पचारे, कल्पना मुने, राजाभाऊ पाथ्रडकर, पुरुषोत्तम आवारी, अशोक नागभीडकर, वंदना आवारी, काजल शेख, मंदा भांगरे, संगिता खाडे, सविता रासेकर, सुपेखा वडिचार, कमल लोणारे, सुशिला कांबळे, अशोक पांडे, अरुण मगराळे, संदीप कांबळे, संदीप ढेंगळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी