भरदुपारी युवकाला लुटले, पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दोन आरोपींना केली अटक

प्रशांत चंदनखेडे वणी 

गुंड प्रवृत्तीच्या दोन तरुणांनी बाहेर गाव वरून आलेल्या एका युवकाला रस्त्यात अडवून लुटल्याची धक्कादायक घटना शहरातील दीप्ती टॉकीज परिसरात २३ सप्टेंबरला भरदुपारी ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी युवकाला लुटणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

कोरपना तालुक्यातील अकोला या गावातील रहिवाशी असलेला नंदकिशोर प्रकाश जिवने (३०) हा युवक आपले खाजगी आटपून गावाकडे जाण्यास निघाला असता त्याला दीप्ती टॉकीज परिसरात दोन गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी अडविले. त्याला धाकदपट करून त्याच्या जवळील मोबाईल व १ हजार ८०० रुपये रोख असा एकूण १६ हजार ८००  रुपयांचा मुद्देमाल बळजबरी हिसकावला. त्यानंतर या दोनही तरुणांनी तेथून पळ काढला. घडलेल्या घटनेने प्रचंड घाबरलेल्या युवकाने सरळ पोलिस स्टेशन गाठून ओढवलेल्या प्रकाराची रीतसर तक्रार नोंदविली. भरदुपारी युवकाला लुटल्याच्या या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत परिसरात अपराधीक कारवाया घडवून आणणाऱ्या आरोपींच्या कुंडल्या शोधून काढत अवघ्या तासांतच दोन आरोपींना अटक केली. हे दोनही आरोपी अट्टल चोरटे असून त्यांच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. साहिल कैलास पुरी (१९) रा. सेवानगर व मयूर राजू गारघाटे (२०) रा. पेटूर ता. वणी अशी या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात सपोनि सुदामा आसोरे करीत आहेत. 



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी