मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड, तीन मटकाबहाद्दरांना अटक, शहरात अवैध धंदे फोफावले


प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील सुजाता टॉकीज परिसरातील ज्योती बियरबार जवळ राजरोसपणे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मटका पट्टी फडणाऱ्या तीन जणांना अटक केली. ही कार्यवाही २४ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. जाणू अनिल शिंगाडे (२३) रा. साई नगरी, प्रथम रवि दुपारे (२०), नासिर खान फिरोज खान पठाण (४२) दोघेही रा. पंचशिल नगर अशी या पोलिसांनी अटक केलेल्या सट्टेबाजांची नावे आहेत. 

ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या आदेशावरून पोलिस पथक शहरात गस्त घालत त्यांना सुजाता टॉकीज परिसरातील ज्योती बियरबार जवळ नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन बघितले असता तेथे काही इसम खुर्च्या टेबल लावून मटका पट्टी फाडतांना आढळून आले. चिठ्यांवर मटक्याचे आकडे लिहून देत लोकांकडून पैसे घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना पोलिसांनी घटनास्थळावरून रंगेहात अटक केली. तर काही सट्टेबाज पळून जाण्यात यशस्वी ठरले. तसेच मटका लावणारे शौकीनही पोलिसांना पाहून सैरावैरा पळत सुटले. भाजी मार्केट जवळच अगदी बिनधास्तपणे हा मटका अड्डा चालविला जात होता. सार्वजनिक ठिकाणी मटका अड्डा थाटून राजरोसपणे मटका जुगार खेळविणाऱ्या सट्टेबाजांना पोलिस पथकाने अटक करून त्यांच्यावर मजुका १२(अ) व बीएनएस च्या कलम ४९ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी त्यांच्या जवळून मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ३२४० असा एकूण ३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मटका अड्ड्याचा मालक मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही.
शहरातील काही भागात कुठे उघड तर कुठे छुप्या पद्धतीने मटका अड्डे सुरू असून पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरच नगर पालिकेच्या दुकान गाळ्याच्या मागील बाजूला मटका अड्डा सुरु असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. नगर पालिकेच्या शेवटच्या दुकान गाळ्याजवळ मटका अड्डा चालविला जात असल्याची उघड चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे. याठिकाणी कधी अमरावती विभागीय पोलिस पथकाने धाड टाकली होती. शहरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्डयांमुळे मटका लावणाऱ्यांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. नोकरदार वर्गांपासून तर गोरगरिबांपर्यंत काही लोक प्रचंड मटक्याच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळतात. आपल्या घामाचा व कष्टाचा पैसा ते मटका जुगार खेळण्यात उडविताना दिसतात. त्यामुळे नंतर आर्थिक परिस्थिती बिकट होऊन टोकाचा निर्णय घेण्यापर्यंतची त्यांची मानसिकता होऊन बसते. त्याकरिता शहरात फोफावू लागलेल्या अवैध धंद्यांवर अंकुश लावणे गरजेचे झाले आहे. शहरात उघड व छुप्या पद्धतीने मटका अड्डे सुरु असून त्यांच्यावरही कार्यवाहीचा बडगा उगारण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी