महाविकास आघाडीचं "ठरलं तर मग" च्या चर्चेने इच्छुक उमेदवारांची वाढली धाकधूक, काँग्रेस गोटात पसरली अस्वस्थता

प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांसह सर्व प्रादेशिक पक्ष व संघटना कामाला लागल्या आहेत. तसेच अपक्ष निवडणूक लढविणाऱ्यांनीही कंबर कसली आहे. त्याचप्रमाणे बंडखोरीच्या वाटेवर असलेलेही आपली रणनीती आखू लागले आहेत. निवडणुकीचा काळ लक्षात घेता सत्ताधारी पक्षाने जनहितकारी कार्याचा सपाटा लावला आहे. जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून त्यांची मनं वळविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. तर विरोधी पक्षांनीही जनतेच्या समस्या व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सुरु केले आहे. जनतेच्या समस्या जाणून घेत त्यावर आवाज उठवला जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्नही उचलून धरले जात आहे. बेरोजगारांच्याही व्यथा ऐकल्या जात आहे. लोकहिताचे कार्य प्रखरतेने करण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष व नेत्यांकडून केला जात आहे. राजकारण्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने त्यांच्यात खंबीर नेतृत्व म्हणून पुढे पुढे करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. पक्षाच्या उमेदवारीचे अनेकांना डोहाळे लागले आहेत. वणी विधानसभा क्षेत्रात इच्छुकांची धुमाळी पाहायला मिळत आहे. इच्छुकांच्या भावुक गर्दीने पक्षश्रेष्ठींसमोरही मोठे पेच निर्माण झाले आहेत.

वणी विधानसभा लढविण्याकरीता अनेकांनी गुढग्याला बाशिंग बांधल्याचे दिसत आहे. सत्ताधारी महायुती बरोबरच महाविकास आघाडीतही उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत वणी विधानसभा मतदार संघ कुणाच्या वाट्याला जातो, ही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काँग्रेस व शिवसेना (उबाठा) आपापली दावेदारी सांगत आहेत. वणी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला (उबाठा) सुटण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मात्र काँग्रेसही आपला दावा मजबूत असल्याचे सांगत आहे. यावर महाविकास आघाडीत मंथन सुरु असतांना आघाडीतीलच काही उतावीळ राजकारणी "ठरलं तर मगं" चा भोंगा वाजवू लागले आहेत. त्यामुळे जनताही संभ्रमात पडली आहे. वणी विधानसभा मतदार संघावर महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेस हे दोनही पक्ष आपापली प्रबळ दावेदारी सांगत असल्याने प्रचंड गोंधळ उडू लागला आहे. अशातच शिवसेनेला वणी विधानसभा मतदारसंघ सुटल्याचे वृत्त व कांग्रेसच्या माजी आमदारांनी त्याचे केलेले खंडन यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. जनताही बुचकळ्यात सापडली आहे. काँग्रेस की शिवसेना ही एकच चर्चा वणी विधानसभा क्षेत्रात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. 

विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकीय नेते सुसाट कामाला लागले. पक्ष बांधणी व पक्ष संघटन बळकट करण्यावर पक्ष नेत्यांचा भर दिसून आला. कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरु झाली. गाव शहरातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्याची स्पर्धा वाढली. विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या भेटी गाठी सुरु झाल्या. कार्यकर्ता मेळावे व सभा सम्मेलने सुरु झाले. ठिकठिकाणी पक्ष प्रवेश सोहळे आयोजित करण्यात आले. जनतेचा विश्वास संपादन करण्याची स्पर्धा सुरु झाली. जनहित कार्यांना ऊत आला. नागरिकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात आले. जनसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. जनतेला लळा लागावा अशी कार्य विधानसभा क्षेत्रात सुरु झाली. जनतेशी नाळ जोडण्याचा हंगाम म्हणजे निवडणुकीचा काळ. या काळात जनतेचे सर्व हट्ट पुरविले जातात. छोटं मोठं कोणतही काम तत्परतेने केलं जातं. राजकीय क्षेत्रात उत्साह भरण्याचं काम निवडणूका करतात. जनता दरबार आणि आपला कारभार जनतेचं हित साधणारा असल्याचे पटवून दिले जाते. 

नेत्यांना जनतेचा कळवळा यायला लागला की निवडणूक जवळ आली असे समजायचे, अशी जुनी लोकं नेहमी म्हणायची. पण आता राजकारण्यांचा उतावीळपणाच निवडणुकीची चाहूल लागल्याचे संकेत देतो. मोठमोठे कार्यक्रम घेण्याची स्पर्धा सुरु होते. आपणच सरस असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. वणी विधानसभा क्षेत्रात मागील दोन वर्षात भव्य दिव्य कार्यक्रमांवर जेवढा खर्च करण्यात आला. त्यात गाव शहरात नविन कंपन्या व कारखाने तयार होऊन कित्येक बेरोजगार कामधंद्यांना लागले असते. मात्र आपला राजकीय हेतू साध्य करण्याकरिता जनतेला भुरळ घालण्याचा प्रयत्न असे बिग बजेट कार्यक्रम घेऊन केला जातो. आता त्यांनी खंबीर नेतृत्व म्हणून पक्षांकडे उमेदवारीसाठी दावा करणे सुरु केले आहे. त्यामुळे आता बाशिंग बांधून असलेल्यांपैकी कुणाचा योग जुळून येतो, याकडे जनता टक लावून बसली आहे. त्यातल्या त्यात वणी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या (उबाठा) वाट्याला गेल्याचे वादळ उठवून देणाऱ्यांनीच नंतर सावरासावर केल्याने चर्चेचा बाजार गरम झाला आहे. 

वणी विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारीसाठी भाजपमध्येही सुरु आहे चढाओढ 

सत्ताधारी पक्षाचे वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढेही पक्षातूनच आव्हान उभे करण्यात आले आहे. भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य व समाजकारणी विजय चोरडिया यांनी देखील भाजप कडून उमेदवारीसाठी दावा केल्याने कार्यकर्ते वेट अँड वॉच च्या भूमीकेत दिसत आहेत. विजय चोरडिया यांच्या भाजप कडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रचंड वाटाघाटी सुरु आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी ते हरसंभव प्रयत्न करतांना दिसत आहेत. उमेदवारीसाठी त्यांनी तगडे आव्हान उभे करून विद्यमान आमदारांना घाम फोडला आहे. मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना विश्वास आहे. विधानसभेच्या दोन पंचवार्षिक निवडणुका त्यांनी गाजविल्या आहेत. २०१४ साली लाटेत त्यांची नाव पार झाल्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिलविला. परंतु चित्र आता हळू हळू पालटू लगाल्याने पक्ष काय भूमिका घेतो यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रात विकासाचं भारूळ निर्माण करणारे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना तिकीट मिळाल्यास ते २०२४ च्याही विधानसभा निवडणुकीत आपली नाव पार करतील काय, हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. की, विजय चोरडिया उमेदवारी मिळविण्यात बाजी मारतील, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

महाविकास आघाडीतही इच्छुकांची भावुक गर्दी 

काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे तीन प्रमुख पक्ष व काही मित्र पक्ष मिळून महाविकास आघाडीची मोट बांधण्यात आली. यातील प्रमुख तीन पक्षांची सिटांसाठी तडजोड सुरु आहे. मित्र पक्षांनाही काही जागा सोडण्यावर विचार विनिमय सुरु आहेत. अशातच वणी विधानसभा मतदार संघ यातील कोणत्या पक्षाच्या वाट्याला जातो, यावर वादळ उठले आहे. वणी विधानसभा मतदार संघासाठी शिवसेना प्रबळ दावेदार मानली जात आहे. मात्र काँग्रेसही आपला दावा सोडायला तयार नाही. अशातच वेगवेगळे वृत्त पसरू लागले आहे. त्यामुळे कार्यक्रत्यांबरोबरच जनताही संभ्रमात पडली आहे. काँग्रेस कडून उमेदवारी मिळावी म्हणून माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह काँग्रेसचे संजय खाडे, टीकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे व महेंद्र लोढा यांचे अथक प्रयत्न सुरु आहेत. माजी आमदार वामनराव कासावार यांनी टायगर बॅक म्हणत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले. सन १९९० ला ते वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून निवडून आले. नंतर त्यांनी वणी विधानसभेच्या चार पंचवार्षिक निवडणुकांमध्ये विजय संपादन केला. त्यानंतर काँग्रेसचा हा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात गेला. 

आता संजय खाडे हे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. संजय खाडे यांनी वणी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम राबवून जनतेत आपली छबी निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु ठेवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र आणून काँग्रेसची विस्कटलेली घडी नीट करण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. यातूनच त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धारही व्यक्त केला. आशिष खुलसंगे यांनी तर वणी विधानसभा क्षेत्रात शेतकरी न्याय यात्रा काढून आपला दावा ठोकला. तर महेंद्र लोढा यांनी हायटेक आरोग्य शिबीर घेतले. विविध कार्यक्रमांत त्यांनी पुढाकार घेतला. पण त्यांनी पक्षश्रेष्ठी म्हणेल तरच एक पाऊल पुढे घेईल, असे जाहीर केले. मात्र टीकाराम कोंगरे याचे  संयमी प्रयत्न सुरु आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे आतून नियोजनबद्ध प्रयत्न सुरु असल्याचे पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. 

शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार विश्वास नांदेकर, शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर तथा उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून संजय देरकर यांची सातत्याने धडपड सुरु आहे. वणी विधानसभा क्षेत्रात त्यांनी शिवसेनेच्या बाळकटीकरणाकरिता प्रचंड मेहनत घेतली. वणी विधानसभा क्षेत्रात भगवा सप्ताह हा उपक्रम राबवून त्यांनी पक्षांतर्गत अनेक कार्यक्रम घेतले. सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांनी शिवसेनेची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला. पक्ष बांधणी व पक्ष संघटन बळकट करण्यावर त्यांनी भर दिला. पक्ष प्रवेश सोहळ्यांचा तर त्यांनी सपाटाच सुरु केला. वणी विधानसभा क्षेत्रात मोठमोठे पक्ष प्रवेश सोहळे घेतले. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मशाल पेटविण्याचा निर्धार करून त्यांनी हा मतदार संघ पिंजून काढला. शिवसेनेचे मतदार आजही एकसंघ आहेत. त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी मिळावी म्हणून ते प्रचंड आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

तेंव्हा वणी विधानसभा क्षेत्राचा तिढा कधी सुटेल व महाविकास आघाडी कडून या मतदार संघासाठी कोणत्या पक्षाची घोषणा होईल, याकडे कार्यकर्ते व जनता टक लावून बसली आहे. त्यातल्या त्यात इच्छुकांपैकी कुणाला पक्षाची उमेदवारी मिळेल, याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचं "ठरलं तर मग" ही वार्ता पसरविण्यात आल्याने उमेदवारी मिळविण्यात इच्छुक असलेल्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.  



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी