जीवनाचा अर्थ कळण्याआधीच नियतीने डाव साधला, राजूर (कॉ.) येथील चिमुकलीवर ओढवला अकाली मृत्यू
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरालगत असलेल्या राजूर (कॉ.) येथील रहिवाशी असलेले संजय जोगदंडे यांची ११ वर्षीय मुलगी डेंग्यू या आजाराने मृत्युमुखी पडली. ही मुलगी मागील ८ ते १० दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर शहरातील एका चाईल्ड स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता. परंतु जोगदंडे पारिवाराची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च उचलणे शक्य झाले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले. परिणामी आजार आणखीच बळावला. अशातच वेळेत आजाराचे न लागलेले निदान व आजारावर मिळू न शकलेला योग्य उपचार यामुळे बुधवार दि. १८ सप्टेंबरला सकाळी या चिमुकलीने शेवटचा श्वास घेतला. कु. श्रद्धा संजय जोगदंडे (११) असे या दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या मुलीचे नाव आहे.
कु. श्रद्धा जोगदंडे या चिमुकलीला नंतर डेंग्यू व कावीळ हा आजार झाल्याचे निदान लागले. असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. कु. श्रद्धा ही राजूर येथील राष्ट्रीय विद्यालयात इयत्ता ५ व्या वर्गात शिक्षण घेत होती. सुस्वभावी व मनमिळाऊ असं तिचं वर्तन होतं. कुटुंबात व परिसरात सर्वांचीच लाडकी असलेली श्रद्धा ही एका गंभीर आजाराची बळी ठरली. शहरासह तालुक्यात सध्या डेंग्यूने थैमान घातले आहे. डेंग्यूची रोकथाम करण्याकरिता प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी राजकीय व सामाजिक क्षेत्रातून सातत्याने होत आहे. राजूर ग्रामपंचायतीलाही नुकतेच निवेदन देऊन डेंग्यू या जीवघेण्या आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. कु. श्रद्धा जोगदंडे हिच्या अशा या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. तिच्या मृतदेहावर आज १८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता राजूर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
Comments
Post a Comment