नवरात्र महोत्सवात वणी येथे येणार तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरातील प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर येथे या वर्षी नवरात्र महोत्सवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी मातेची अखंड ज्योत प्रज्वलित करून ती वणी नगरीत आणण्याचा निर्धार दुर्गा माता मंदिर समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी केला आहे. रवि बेलुरकर हे मागील अनेक वर्षांपासून नवशक्ती दुर्गा माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यांच्या प्रयत्नातून मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. मातेच्या भक्तिकार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या रवि बेलुरकर यांनी या वर्षी नवरात्र महोत्सवात कुलस्वामिनी मातेची अखंड ज्योत वणी नगरीत आणण्याचा निर्धार केला आहे.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचं मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर कुलस्वामिनी देवी भवानी माता पार्वतीचे दुसरे रूप आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पिठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी मातेची अखंड ज्योत प्रज्वलित करून ती वणी नगरीत आणण्याचा अभिनव उपक्रम मंदिर समितीने हाती घेतला आहे.
दरवर्षी एका शक्तिपीठातून मातेची अखंड ज्योत आणली जाते. मागील वर्षी माहूर येथून रेणुका मातेची ज्योत प्रज्वलित करून वणी नगरीत आणली होती. भारतातील ५१ शक्तिपीठाद्वारे अखंड प्रज्वलित ज्योतीतून जगदंबा मातेचा साक्षात्कार होत असल्याचा भाविकांचा अनुभव आहे. अशा पवित्र ठिकाणावरून ज्योत प्रज्वलित करून ती घटस्थापनेच्या दिवशी वणी नगरीत आणली जाणार असल्याने भाविकांना त्याचे दर्शन घडणार आहे. या ज्योतीची विविध पूर्व स्थापना करून त्याचे पावित्र्य जपन करून नवरात्र उत्सवाला मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने प्रारंभ होतो.
यावर्षी नवरात्र उत्सवात तुळजापूर येथील भवानी मातेची ज्योत वणी नगरीत आणून २ ऑक्टोबरला या ज्योत यात्रेला शुभारंभ होणार आहे. ३ ऑक्टोबरला दुर्गामाता देवी घटस्थापनेच्या दिवशी वणी नगरीत आणलेली ही अखंड ज्योत नवशक्ती दुर्गा माता मंदिर येथे भक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. ९ दिवस विविध कार्यक्रमांनी नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. ही अखंड ज्योत वणी नगरीत आणण्यासाठी दुर्गा माता मंदिर समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्या सोबत दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुर्ले, नितीन बिहारी, राजकुमार अमरवानी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदळे, अमोल बदखल, सतिश कामटकर, मारुती गोखरे यांचा देखील सहभाग राहणार आहे. या अखंड ज्योत यात्रेचे स्वागत दुर्गा माता मंदिर समिती व वणी नगरीतील सर्व भाविक भक्तांकडून करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी दिली.
Comments
Post a Comment