आठ दिवसांत तीन पोलिसांवर निलंबनाची कार्यवाही, वणी पोलिस स्टेशन आले चर्चेत


प्रशांत चंदनखेडे वणी 

निलंबनाच्या कार्यवाहीने सध्या वणी पोलिस स्टेशन गाजत आहे. दोन पोलिस शिपायांचे निलंबन झाल्याची घटना ताजी असतांनाच वणी पोलिस स्टेशन मधील आणखी एका महिला पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील सुजाता टॉकीज परिसरात एका दुचाकीवर दंडात्मक कार्यवाही केल्यानंतर दंडाची रक्कम स्वतःच्या फोन-पे वर मारून घेतली. नंतर दुचाकी मालकाला चालन पावती मात्र कमी रक्कमेची मिळाल्याने पोलिसांची कर्तव्यनिष्ठता चव्हाट्यावर आली. मोटारसायकलवर चलान करण्याच्या नावाखाली जनतेची आर्थिक लूट करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या ढासळलेल्या नीतिमत्तेचा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर वायरल झाला. वृत्त वाहिन्यांवरून पोलिसांच्या असंवेदनशीलतेचे धिंडवडे काढण्यात आले. तसेच पोलिसांच्या या पैसेखाऊ प्रवृत्तीची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर वणी पोलिस स्टेशन मधील महिला सहाय्यक फौजदार स्वाती कुटे यांना निलंबित केले आहे. स्वाती कुटे यांच्या निलंबनाचे आदेश १२ ऑक्टोबरला पोलिस स्टेशनला धडकले. 

स्वाती कुटे या वणी पोलिस स्टेशनमध्ये एएसआय या पदावर कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या वणी वाहतूक उपशाखेत कार्यरत होत्या. नंतर त्यांनी वणी पोलिस ठाण्यात आपली बदली करून घेतली. २६ सप्टेंबरला पोलिस शिपाई सागर सिडाम यांनी सुजाता टॉकीज परिसरात रस्त्यावर उभी असलेली विनाक्रमांकाची दुचाकी पोलिस स्टेशनला आणली. त्यानंतर वाहतूक पोलिस प्रदीप भानारकर यांना गाडीचे कागदपत्र तपासून दुचाकीवर चलान करण्यास सांगितले. मात्र एएसआय स्वाती कुटे यांनी यात हस्तक्षेप करून मोटारसायकल मालकावर स्वतःच दबाव आणण्याचा प्रयत्न केला. स्वाती कुटे यांनी मोटारसायकलवर एक हजार रुपयांचे चलान केले असल्याचे सांगून चलानाची रक्कम फोन-पे वर पाठविण्यास सांगितले. मोटारसायकल मालकाने एक हजार रुपये स्वाती कुटे यांच्या फोन-पे वर पाठविले. परंतु त्यावेळी दुचाकी मालकाला चलान पावती मात्र देण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी दुचाकी मालकाला पाचशे रुपयांची चलान पावती देण्यात आली. यावरून दुचाकी मालकाने प्रश्न उपस्थित केला असता त्याला पोलिसी रुबाब दाखविण्यात आला. शेवटी दुचाकी मालक आदर्श संजय गुरफुडे रा. इंदिरा चौक याने पोलिसांकडून झालेल्या आर्थिक पिळवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल केला. एवढेच नाही तर दुचाकीवर चलान करतांना अधिकचे पैसे उकळण्यात आल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. 

जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर एएसआय स्वाती दादाराव कुटे यांना निलंबित केले. निव्वळ पाचशे रुपयांच्या लालसेपोटी महिला सहाय्यक फौजदाराला निलंबनाच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागले. गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारांचा शोध लावण्याकरिता केला जातो. डिजिटल युगात वावरत असतांना पोलिसांनाच याचा विसर पडावा, ही मोठी शोकांतिका आहे. ऑनलाईन पैसे पाठविल्यानंतर ते लपणार नाही, याची जाणीव असतांनाही महिला पोलिसांनी चलान पावती कमी रक्कमेची दिली. फोन-पे वर पैसे पाठविल्याचा पुरावा व दुचाकीला चलान केल्याची पावती दुचाकी मालकाने सोशल मीडियावर शेयर केली. त्यानंतर हेच पुरावे त्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही पाठविले. त्यात महिला पोलिसाने पाचशे रुपयांची रक्कम परस्पर लाटल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे एएसआय स्वाती कुटे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. आठ दिवसांपूर्वी निलंबित झालेल्या त्या दोन पोलिसांनीही मोबाईलवरच आपले पुरावे सोडले होते. त्यामुळे पोलिसांचे मोबाईल कारनामे आता त्यांच्याच अंगलट येऊ लागले आहेत. आठ दिवसांत तीन पोलिसांवर झालेल्या निलंबनाच्या कार्यवाहीने वणी पोलिस स्टेशन आता चांगलेच चर्चेत आले आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी