पत्रकार परिषदेदरम्यान झळकले उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्त, आणि आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या चेहऱ्यावर उसळली आनंदाची लहर
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वतीने आज विराणी फंक्शन हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र सरकारच्या विकासकामांची मीमांसा करीत आपल्या १० वर्षाच्या कार्यकाळात वणी विधासभा क्षेत्रात केलेल्या विकासकामांचा आराखडा मांडत असतांनाच पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्याचे वृत्त झळकले. या यादीत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नाव ३१ व्या क्रमांकावर होते. पक्षाने उमेदवारी दिल्याचे जाहीर होताच आमदारांचा चेहरा आनंदाने फुलून निघाला. उमेदवारी मिळण्याबाबत सुरु असलेली धाकधूक संपल्याने आमदार भारावून गेले. कार्यकर्त्यांनीही एकच जल्लोष केला. मात्र उमेदवारी जाहीर झाल्याने आमदारांनी पत्रकार परिषदेत मनातील खद व जास्तीचे स्पष्टीकरण देणे टाळले. पत्रकार परिषदेतच उमेदवारी मिळाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. विद्यमान आमदारांवरच पक्षाने विश्वास दाखविल्याने पक्ष भाकरी फिरविणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने इच्छुकांच्या उमेदवारीसाठी रांगा लागल्या. स्थानिक पक्ष नेते आपापल्या परीने उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. सर्वांच्या दिल्ली, मुंबई वाऱ्या सुरु झाल्या. तिकीट आपल्यालाच मिळेल या अविर्भावात स्थानिक नेते वावरत होते. विद्यमान आमदारांना उमेदवारीत डच्चू मिळेल असे जोरदार तर्क लावले जात होते. पक्षातील अनेकांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली.होती. त्यामुळे काहीसं निराशमय वातावरण निर्माण झालेलं असतांना आज आनंदाचा बॉम्ब फुटला. आमदार बोदकुरवार यांनीच उमेदवारी खेचून आणण्यात यश मिळविले. त्यामुळे आता भाजपाच्या उमेदवारीवरून सुरु असलेल्या चर्चा बासनात जमा झाल्या आहेत. भाजप कडून उमेदवारी जाहीर झाली असली तरी महाविकास आघाडीतील सस्पेन्स मात्र अद्याप दूर झालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो, व उमेदवारीसाठी रांगेत असलेल्यांपैकी कुणाला उमेदवारी मिळते, याकडे वणी विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अनेक दिवसांपासून नियोजित असलेली पत्रकार परिषद आज घेतली. त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विकासाची मीमांसा करतांनाच मागील दहा वर्षात वणी विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासकामांचा लेखाजोगा मांडला. अनेक महत्वकांक्षी योजना सरकार कडून राबविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वणी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठीही निधी खेचून आणल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. १० वर्षात वणी विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा धडाका लावल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ते काही महत्वाचे मुद्दे मांडत असतांनाच त्यांना पक्षाकडून उमेदवारी झाल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. पत्रकार परिषदेतच आनंदाची लहर उसळली. कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र आमदारांनी शेवटी उमेदवारी खेचून आणलीच, ही एकच चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.
पत्रकार परिषदेला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपचे विजय पिदूरकर , दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर, बंडू चांदेकर, गजानन विधाते, सत्यजित ठाकुरवार, संतोष डंभारे, हेमंत गौरकार, खाडे तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment