अधिकाऱ्यांची भ्रष्ट प्रवृत्ती परत एकदा आली समोर, ७० हजारांची लाच स्वीकारतांना पुरवठा निरीक्षकांना रंगेहात अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तहसील कार्यालयातील अन्न धान्य पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षकाला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. ही कार्यवाही दुपारी ४ ते ४.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कार्यवाहीने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. एक जबाबदार अधिकारी राशन दुकानदाराकडून लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने शहरात एकच चर्चा रंगली आहे. प्रशासकीय विभागात वाढत चाललेली लाचखोर प्रवृत्ती चिंतेचा विषय बनली आहे. काळ्या पैशाच्या मोहात अधिकारी भ्रष्टाचारी बनू लागल्याने कामकाजात पारदर्शकता राहिली नसल्याचे दिसून येत आहे. अधिकाऱ्यांचे खिशे गरम केल्याशिवाय कोणतीही महत्वाची कामे होत नसल्याचे अनेकांचे अनुभव आहेत. एसीबीच्या या कार्यवाहीने परत एकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांची भ्रष्ट प्रवृत्ती उघडकीस आली आहे.
महसूल प्रशासनाच्या अन्न धान्य पुरवठा विभागातील नवनियुक्त पुरवठा निरीक्षक संतोष उईके यांच्यावर आज २४ ऑक्टोबराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कार्यवाही केली. भालर येथील स्वस्त धान्य वितरक बंडू देवाळकर यांच्याकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना संतोष उईके यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. पुरवठा निरीक्षक संतोष उईके यांनी बंडू देवाळकर यांचे राशन दुकानाशी संबंधित काम करून देण्याकरिता ७० हजारांची लाच मागितली. त्यामुळे बंडू देवाळकर यांनी याबाबत अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर संतोष उईके यांना रंगेहात अटक करण्याकरिता आज तहसील कार्यालयात सापळा रचला. ठरल्या प्रमाणे बंडू देवाळकर यांना रक्कम देण्याकरिता पाठविण्यात आले. आणि त्यांच्याच पाठोपाठ एसीबीचे अधिकारी तेथे पोहचले. पुरवठा निरीक्षक संतोष उईके हे बंडू देवाळकर यांच्या कडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारत असतांनाच अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात अटक केली. ही कार्यवाही एसीबीचे अमरावती विभागाचे निरीक्षक योगेश दंदे व त्यांच्या टीमने केली. संतोष उईके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. एसीबीच्या या कार्यवाहीने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
Comments
Post a Comment