संजय देरकर यांचं शिवसैनिकांनी केलं जंगी स्वागत, मुंबई वरून उमेदवारी घेऊनच ते वणीला परतले
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या (उबाठा) वाट्याला गेल्यानंतर शिवसेनेकडून संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून शर्थीचे प्रयत्न करणारे संजय देरकर हे काही दिवसांपासून मुंबईतच ठाण मांडून होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते मुंबई वरून परतीच्या मार्गाला निघाले. वणी मतदार संघातून उमेदवारी मिळावी याकरिता अनेक दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. त्यामुळे या मतदार संघाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सेना की काँग्रेस असा क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारा वणी मतदार संघ अखेर शिवसेनेच्याच वाट्याला गेला.
संजय देरकर हे शिवसेनेकडून उमेदवारीसाठी स्ट्रॉंग दावेदार मानले जात होते. आणि पक्षानेही त्यांच्यावरच विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी बहाल केली. मुंबई वरून उमेदवारी घेऊन वणीला परतलेल्या संजय देरकर यांचं शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी जोरदार स्वागत केलं. संजय देरकर यांचं शिवतीर्थ येथे आगमन झाल्यानंतर ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसैनिकांनी त्यांचं भव्य स्वागत व अभिनंदन केलं. उमेदवारी खेचून आणण्यात संजय देरकर हे यशस्वी ठरल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. त्यामुळे शिवसैनिक त्यांच्या विजयाचे जोरजोरात नारे देतांना दिसले. संजय देरकर यांनी शिवसैनिकांचे आभार मानून त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. संजय देरकर यांनी वणीला परतल्यानंतर सर्वप्रथम सद्गुरू जगन्नाथ महाराजांचे दर्शन घेतले. नंतर महापुरुषांच्या पुतळ्यांना हारार्पण करून त्यांना अभिवादन केले.

वणी मतदारसंघात तुल्यबळ लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीने विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावरच विश्वास दाखविला तर महाविकास आघाडीने संजय देरकर यांच्या रूपाने तगडा उमेदवार रिंगणात उतरविला आहे. तर मनसेच्या राजू उंबरकर यांनीही यावेळी ताकदीनिशी मैदानात उडी घेतली आहे. तीनही राजकीय पक्षांनी आपापले रांगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याने लढत रंगतदारच होईल यात शंका नाही. वंचित बहुजन आघाडीने मात्र अद्याप आपले पत्ते उघड केले नाही. त्यामुळे वंचित कडून रिंगणात उतरविण्यात येणारा उमेदवार कुणाचे गणित बिघडवितो हे ही पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने आता लवकरच प्रचाराचा धुराळा उडतांना दिसणार आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास संपादन करण्यात कोण यशस्वी ठरतं, हे आता येणारा काळच सांगेल.
Comments
Post a Comment