अकारण घालून वाद, त्या दोघांनी केले त्याला जीवनातूनच बाद
प्रशांत चंदनखेडे वणी
मारेगाव तालुक्यातील बाबईपोड येथील मृतावस्थेत आढळलेल्या युवकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या २४ तासांतच पोलिसांनी युवकाच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा केला. विनाकारण वाद घालून दोघांनी मिळून या विवाहित युवकाचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. युवकाची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. खुनाच्या या घटनेने मारेगाव तालुका हादरला आहे. २५ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. मृतकाच्या वडिलाने मुलाचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याचा संशय पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला होता. त्यानंतर शवविच्छेदन अहवालावरूनही युवकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलिसांनी चहू बाजूंनी वेगवान तपास करीत अवघ्या २४ तासांतच खुन्यांच्या मुसक्या आवळल्या. भीमराव तुकाराम मडावी (३१) रा. बाबईपोड ता. मारेगाव असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर गोलू पुसदेकर व संतोष पडोळे दोघेही रा. कुंभा अशी या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मृतक भीमराव मडावी हा बाबईपोड येथील रहिवाशी होता. तो दारूचा प्रचंड व्यसनी होता. त्याच्या व्यसनामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली. पत्नी सोडून गेल्याने तो एकटाच घरी राहायचा. २४ ऑक्टोबराला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तो त्याच्या वडिलांना धरनपोडकडे जातांना दिसला. बराच उशीर होऊनही तो घरी न परल्याने वडिलांनी तो पत्नीकडे सासरी गेला असावा असा अंदाज बांधला. मात्र २५ ऑक्टोबराला कुंभा-श्रीरामपूर मार्गावरील एका शेताजवळ गावातीलच काही लोकांना त्याचा मृतदेह आढळून आला. गावातील एका मुलाने फोन करून तुमचा मुलगा मृतावस्थेत पडून असल्याचे वडिलांना सांगितले. वडिलांनी गावच्या पोलिस पाटलांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. नंतर याबाबत मारेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. मारेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला, व मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मुलाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने वडिलांनी मुलाचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याचा संशय पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला. मृतकाच्या गळ्याभोवती ओढणीचा फास आढळून आला. गळा पूर्णपणे सुजला होता. नाकातून रक्त निघत होते. एकूणच घातपाताचा संशय बळावल्याने पोलिसांनी वेगळ्या अँगलने तपास सुरु केला. एसडीपीओ गणेश किंद्रे यांनी संपूर्ण तपास यंत्रणा कामी लावली. चहू बाजूंनी वेगवान तपास करीत अवघ्या २४ तासात पोलिसांनी या मृत्यू प्रकरणाचा छडा लावला.
मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील गोलू पुसदेकर व संतोष पडोळे यांनी भीमराव मडावी या युवकासोबत अकारण वाद घातला. त्यानंतर त्या दोघांनी मिळून भीमराव याचा ओढणीने गळा आवळून निर्घृण खून केला. हे पोलिस तपासात समोर आले आहे. भीमराव मडावी हा रात्री उशिरा घराकडे जात असतांना या दोघांनी त्याला वाटेत गाठले. आणि त्याचा ओढणीने गळा आवळून खून केला. पोलिसांनी शीघ्र तापासचक्रे फिरवून या खून प्रकरणाचा उलगडा केला असून दोनही मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहे. या खून प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांनी आपला मार्ग मोकळा करण्याकरिता निष्पाप जीवाचा बळी घेतल्याचे बोलल्या जात आहे. यावरून मानवी संवेदना किती घातक झाल्या, याचा प्रत्यय येतो. सहनशीलता लोप पावत चालली असून मनुष्याचा स्वभाव उद्वेगी झाला आहे. मनुष्याला मन, भावना राहिल्या नाहीत. मानवी स्वभाव आक्रमक झाला असून माणूसच माणसाच्या जीवावर उठू लागला आहे. एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत माणूस निर्दयी बनला आहे. आणि भीमराव मडावी हा त्याच निर्दयी स्वभावाचा बळी ठरला आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच या खून प्रकरणाचा पर्दाफाश केला, व खुन्यांना गजाआड केले.
ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संजय सोळंखे, पोउपनि प्रमोद जिद्देवार, जमादार अजय वाभीटकर, एसडीपीओ कार्यालयातील इकबाल शेख, विजय वानखेडे यांनी केली.
Comments
Post a Comment