कसलीही नाही फूट, महाविकास आघाडी आहे एकजूट, संजय देरकर यांच्या नामांकन रॅलीत उसळला जनसागर


प्रशांत चंदनखेडे वणी 

यवतमाळ जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी खातंही उघडू शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. भाजपने जनतेचा भ्रम निरास केला आहे. अनेक फसव्या योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांची पूर्ती दैना या भाजप सरकारने केली आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारं हे भाजप सरकार महाराष्ट्रातून उखडून टाकल्याशिवाय महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही. मतदारांचा कल महाविकास आघाडीकडे वाढला आहे. सर्वसामान्यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आहे. महाविकास आघाडीच बेरोजगारांना न्याय देऊ शकेल. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यास सरकारी नोकऱ्यांमधील खाजगीकरण रद्द करण्यात येईल. नोकरदार वर्गांसाठीचे जाचक जीआरही रद्द करण्यात येईल. सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदांचा अनुशेषही तात्काळ भरण्यात येईल. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यात महाविकास आघाडी कटिबद्ध राहील. 

जी आश्वासने निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीकडून देण्यात येत आहेत, ती सर्व पूर्ण करण्याचा महाविकास आघाडीचा सर्वोतपरी प्रयत्न राहील. निवडणुकीच्या तोंडावर महिलांचा खोटा पुळका दाखवून भावनिक करणारं हे सरकार सर्वसामान्य कुटुंबांना महागाईचे चटके देत आहे. मात्र महाविकास आघाडीचं सरकार महागाईही कमी करेल आणि लाडक्या बहिणींना निस्वार्थ भावनेतून २००० रुपये महिना देईल. त्याकरिता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार मतदारांनी केला पाहिजे. वणी मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांना निवडून आणण्याची जबादारी मतदारांची आहे. संजय देरकर यांच्या विषयी कुठलीही नाराजी न ठेवता मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवावा, अशी साद यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी मतदारांना घातली. ते संजय देरकर यांच्या नामांकन सभेत बोलत होते.

संजय देरकर यांच्या समर्थनार्थ आज जत्रा मैदान परिसरातील हनुमान मंदिरापासून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली. संजय देरकर यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आज आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी पूर्ण महाविकास आघाडी एकवटली होती. वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. शहरातील रस्ते समर्थकांच्या गर्दीने गजबजून उठले होते. कानाकोपऱ्यातून समर्थक आपल्या लाडक्या नेत्याच्या समर्थनार्थ रॅलीत सामील झाले होते. महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन प्रमुख पक्षांसह आप, माकप व अन्य घटक पक्षातील नेतेही रॅलीत सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे सर्व नेते एक दिलाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी एकवटल्याचं चित्र आज या भव्य शक्ती प्रदर्शनातून पाहायला मिळालं. संपूर्ण शहर महाविकास आघाडीच्या रॅलीने व घोषणांनी गजबजून गेलं होतं. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. महाविकास आघाडीत कोणतीच नाराजी अथवा फूट नसल्याचे या शक्ती प्रदर्शनातून दिसून आले. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत व सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या साक्षीने संजय देरकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

या निमित्ताने शासकीय मैदानावर भव्य सभा घेण्यात आली. या सभेला यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी प्रामुख्याने हजेरी लावली. मंचकावर माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह काँग्रेसचे टिकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे, महेंद्र लोढा, प्रदीप बोनगीरवार, अरुणा खंडाळकर शिवसेनेचे राजेंद्र गायकवाड, संजय निखाडे, सुनिल कातकडे, दीपक कोकास राष्ट्रवादीचे विजय नगराळे, दिलीप भोयर माकपचे कुमार मोहरमपुरी, ऍड. दिलीप परचाके तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

माझा विजय हा महाविकास आघाडीशी जुळलेल्या प्रत्येकाचा विजय असेल, संजय देरकर 

महाविकास आघाडीतील प्रत्येक नेत्याला विश्वासात घेऊन कार्य करण्याची ग्वाही यावेळी संजय देरकर यांनी दिली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळल्यानंतर सर्वांशीच विश्वासपूर्ण चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. विजयानंतर सर्व घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा करूनच कार्य केलं जाईल. सर्वांच्याच कार्यकर्त्यांची कामे करण्याचा प्रयत्न केला जाईल. महाराष्ट्रात आज हुकूमशाही सरकार आहे. त्याला खाली खेचणं आधी गरजेचं आहे. शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आणणं गरजेचं आहे. वणी विधानसभा क्षेत्रात कोट्यवधींची रस्त्यांची कामे झाली. यात आमदारांनीच आपला विकास साधून घेतला. संबंधित कंत्राटदार मालामाल झाले. रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली. परंतु सरदारच त्यात गुंतला असल्याने आक्षेप घेईल तरी कोण. नव्याने बांधकाम झालेले रस्ते अल्पावधीतच उखडू लागले आहेत. निव्वळ रस्ते व बांधकामांवर पैसा उधळण्यात आला. मात्र बेरोजगारी दूर करण्यावर कुठल्याच उपाययोजना करण्यात आल्या नाही. निव्वळ फसव्या व खोटारड्या योजना सरकारकडून राबविण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्यायला हे सरकार तयार नाही. कष्टकऱ्यांच्या हाताला काम मिळेनासं झालं आहे. शिक्षणाचं खासगीकरण सुरु झालं आहे. जाती धर्माचं राजकारण केलं जात आहे. न्याय व्यवस्था संपुष्टात आणण्याचं काम हे भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विषमतावादी विचारसरणीचं भाजपचं हे सरकार सत्तेबाहेर खेचणं गरजेचं झालं आहे. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी मतदारांनी महाविकास आघाडीला सत्तेत आणावं, अशी आर्त हाक या विशाल सभेतून संजय देरकर यांनी मतदारांना दिली. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी