पाच उमेदवारी अर्ज रद्द, ४ नोव्हेंबर पर्यंत स्पष्ट होईल उमेदवारांचे खरे चित्र
प्रशांत चंदनखेडे वणी
विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढल्याने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मतदार संघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत. पक्षांचे कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्याकरिता मतदारही सज्ज झाले आहेत. २० नोव्हेंबरला विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. विधानसभा लढविण्यास इच्छुक असलेल्या २० उमेदवारांनी वणी मतदार संघातून आपले नामांकन अर्ज दाखल केले होते. काल ३० ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची पडताळणी करण्यात आली. यात ५ उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले आहेत. उमेदवारीसाठी आवश्यक निकषांची पूर्तता करण्यात न आल्याने किंवा उमेदवारी अर्ज भरतांना काही त्रुटी राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पडताळणी दरम्यान ५ उमेदवारी अर्ज रद्द केले. निवडणुकीतून नामांकन वापस घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर असून यानंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील हे स्पष्ट होणार आहे.
वणी मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळविण्यासाठी घमासान पाहायला मिळाले. अनेकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न केले. शेवटी महायुतीकडून भाजापचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनाच उमेदवारी जाहीर झाली. मात्र महाविकास आघाडीचा तिढा सुटायला बराच वेळ लागला. काँग्रेस की सेना या चक्रव्यूहात अडकलेला हा मतदारसंघ अखेर शिवसेनेच्या वाट्याला गेला. वणी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून संजय खाडे यांनी आपली पूर्ण ताकद लावली होती. वणी विधानसभा लढविण्याचा त्यांचा सुरुवातीपासूनच निर्धार होता. तशी त्यांनी तयारीही केली होती. मात्र शेवटपर्यंत उत्कंठा वाढविणारा हा मतदार संघ शिवसेनेच्या कोट्यात गेला. आणि संजय खाडे यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. त्यानंतरही काँग्रेस आपल्याला एबी फार्म देईल अशी त्यांना शाश्वती होती. मात्र तीही शक्यता आता संपुष्ठात आली आहे. त्यांनी काँग्रेस कडून भरलेला नामांकन अर्ज एबी फार्म न मिळाल्याने रद्द झाला आहे. परंतु अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक रिंगणात कायम आहेत. त्यामुळे त्यांची बंडखोरी कुणाच्या पथ्यावर पडेल हे आता येणारा काळच सांगेल.
वणी मतदार संघातून सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेना नेते संजय देरकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचप्रमाणे संजय खाडे यांनी देखिल अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. नामांकन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले. यामध्ये वंचित कडून राजेंद्र निमसटकर, बहुजन समाज पार्टी कडून अरुण कुमार खैरे, राष्ट्रीय गोंडवाना पार्टी कडून प्रवीण आत्राम, कम्युनिस्ट पार्टी कडून अनिल हेपट, संभाजी ब्रिगेड कडून अजय धोबे तर अपक्ष म्हणून राहुल आत्राम, निखिल ढुरके, केतन पारखी, असीम हुसैन मंझूर हुसैन, हरीश पाते, नारायण गोडे, यशवंत बोन्डे, संतोष भादीकर, देवराव वाटगुरे, सुनिल राऊत, रत्नपाल कनाके अशा एकूण २० उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी संजय खाडे यांचा एक अर्ज रद्द झाला. तर एक मंजूर झाला आहे. मात्र संतोष भादीकर, देवराव वाटगुरे, सुनिल राऊत रत्नपाल कनाके यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहेत. ४ नोव्हेंबर पर्यंत निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांचेही चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर किती उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात कायम राहतील, हे दिसून येणार आहे. असे असले तरी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपली मोर्चे बांधणी सुरु केली आहे. विजयासाठी डावपेच आखले जात आहे. निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे.
Comments
Post a Comment