शक्ती प्रदर्शनासह राजू उंबरकर दाखल करणार आज नामांकन अर्ज
प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य नेते राजू उंबरकर यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आज २५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वणी विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांनाच राजू उंबरकर यांच्या कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. मनसेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व समर्थकांना सोबत घेऊन ते आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान शासकीय मैदान येथे मनसेकडून आयोजित एका छोटेखाणी कार्यक्रमात जनतेचा आशीर्वाद घेऊन ते निवडणुकीच्या पुढील तयारीला लागणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रदीर्घ वाटचाल करतांनाच पक्षाच्या धेय्य धोरणावर चालणाऱ्या राजू उंबरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रात पक्षाचं मूल्यांकन वाढविलं आहे. ताकदीने पक्षाची धुरा वाहिली आहे. पक्ष कार्यात स्वतःला वाहून घेतलं आहे. वणी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचा दबदबा कायम ठेवला आहे. पक्षाच्या माध्यमातून तेवढ्याच ताकदीने जनतेचे प्रश्नही सोडविले आहेत. हक्काचा नेता म्हणून सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे हक्काने आपल्या समस्या घेऊन जाते. त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्याशिवाय राजू उंबरकारही स्वस्त बसत नाही. आज हा लोकनेता लोकांच्या आशीर्वादाने लोकांचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेवर जाण्याकरिता नामांकन अर्ज दाखल करणार आहे. सदैव सर्वसामान्यांच्या हक्कासाठी झटलेला हा नेता सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहचविण्याकरिता जनतेचा आशीर्वाद मागत आहे. आणि यावेळी जनता निराश करणार नाही, अशी अपेक्षाही मनसेचा हा लढवय्या नेता बाळगून आहे.
Comments
Post a Comment