नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संजय देरकर यांनी दर्शविला पाठिंबा, खासदार संजय देशमुख यांनी घेतली दखल
प्रशांत चंदनखेडे वणी
वन्य प्राण्यांच्या हौदोसाने शेत पिकांचे प्रचंड नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. वन्य प्राण्यांनी शेत पिकांच्या केलेल्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीला घेऊन नायगाव (खु.) येथील शेतकऱ्यांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर १० ऑक्टोबर पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी आपला पाठिंबा दर्शविला. त्यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन शासन दरबारी त्यांच्या मागण्या मांडण्याचे आश्वासन देतानाच आंदोलन स्थळावरूनच त्यांनी यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्याशी फोनवर चर्चा केली. खासदार संजय देशमुख यांच्याशी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत झालेल्या चर्चेनंतर संजय देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. तसेच शेतकऱ्यांना शेत पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्याचे त्यांनी संजय देरकर यांना आश्वासन दिले.
वन्य प्राण्यांच्या हौदोसाने शेतकरी प्रचंड हैराण झाले आहेत. शेतात रानटी जनावरं धुमाकूळ घालत असल्याने उभी पिकं नेस्तनाभूत होऊ लागली आहेत. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही वन विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देतांना दिसत नाही. वन्य प्राण्यांच्या धुमाकूळ घालण्याने शेतातील उभी पिकं नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वन्य प्राण्यांच्या हौदोसाने शेतातली उभी पिकं लोळल्याने शेतकरी संकटात आला आहे. वन्य प्राण्यांनी शेत पिकांच्या केलेल्या नुकसानीचे पंचनामे करून अनेक दिवस लोटली आहेत. मात्र नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नाही. याबाबत वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्याने शेवटी नायगाव (खु.) येथील शेतकऱ्यांनी वणी वन विभाग कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सहाय्यक उप वनसंरक्षण अधिकारी पांढरकवडा यांच्याकडे केलेल्या मागण्यांमध्ये सन २०२३-२०२४ मध्ये वन्य प्राण्यांच्या हौदोसाने झालेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, वन्य प्राण्यांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीला पक्के कुंपण करून द्यावे, वन्य प्राण्यांकडून शेत पिकांचे होणारे नुकसान पीक विम्यामध्ये समाविष्ट करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांकडून शेत पिकांच्या नुकसान भरपाईसह विविध मागण्यांना घेऊन करण्यात येणाऱ्या आंदोलनाला शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी भेट दिली. त्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. संजय देरकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन देतानाच त्यांनी आंदोलन स्थळावरूनच यवतमाळचे खासदार संजय देखमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी माहिती दिली. तसेच त्यांच्या मागण्यांबाबतही अवगत केले. संजय देरकर यांच्या संजय देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संजय देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत लवकरच त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. संजय देरकर यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment