शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत राजू उंबरकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, मनसे कडून करण्यात आले जोरदार शक्ती प्रदर्शन
प्रशांत चंदनखेडे वणी
मनसेचे राज्य नेते राजू उंबरकर हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने त्यांच्या समर्थनार्थ मोठा जनसमुदाय शासकीय मैदानावर जमा झाला. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत राजू उंबरकर यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला. समर्थकांनी मनसेचे झेंडे हातात घेऊन त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. वणी विधानसभा क्षेत्रातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान शासकीय मैदानावर छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर शासकीय मैदानावरूनच भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयाजवळ पोहचल्यानंतर राजू उंबरकर यांनी उपविभागीय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
विदर्भात राजू उंबरकर यांना सर्वप्रथम विधानसभेची उमेदवारी जाहीर करून राज ठाकरेंनी आपला विदर्भातील हुकुमी एक्का पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरवला आहे. याच पार्श्वभूमीवर आज राजू उंबरकर यांनी शहरातून रॅली काढत आपल्या शेकडो समर्थकांसह वणी विधानसभा मतदार संघासाठी नामांकन अर्ज दाखल केला.
वणी विधानसभा क्षेत्रातीलच नाही तर संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागलेल्या वणी विधानसभा मतदार संघाची तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन पक्षाने राजू उंबरकर यांच्यावर विश्वास दाखविला आहे. राजू उंबरकर यांनी जनतेच्या विविध अडी अडचणी सोडवितानाच त्यांचे प्रश्न व समस्याही उचलून धरल्या आहेत. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी नेहामी आवाज उठविला आहे. विद्यार्थी व युवकांच्या अनेक समस्यांचे समाधान केले आहे. जनतेच्या समस्यांना घेऊन राजू उंबरकर नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे त्यांच्या पाठीशी जनाधारही भक्कम आहे. याच आधारावर पुन्हा एकदा राजू उंबरकर या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन शहारत भव्य मिरवणूक काढली. तसेच मनसेकडून शहरात जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आले. त्यानंतर वणी येथील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर करुन राजू उंबरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात मागील काळात सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकमेकांवर तुफान चिखलफेक केली. नेत्यांच्या सारख्या इकडून तिकडे कोलांट उड्या सुरु आहेत. नेत्यांच्या अशा या हरकतींमुळे जनता वैतागली असुन यंदा जनते समोर मनसे हा पर्याय उभा राहिला आहे. आज उंबरकर यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा नशीब आजमावणाऱ्या या हक्काच्या नेत्याला यावेळी तरी मतदारांचा कौल मिळेल काय, हे आता येणारा काळच सांगेल.
Comments
Post a Comment