शिक्षण, आरोग्य, रोजगार व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे झालेलं दुर्लक्ष ठरलं विजयात अडसर
प्रशांत चंदनखेडे वणी
विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागले. वणी विधानसभा मतदार संघाचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला असला तरी तो सर्वांना आश्चर्य चकित करणारा ठरला. या निकालाने उमेदवारांचे सर्व डावपेच उलटे पाडले. विजयासाठी उमेदवारांनी आखलेल्या रणनीतीही सपशेल फेल ठरल्या. काही उमेदवारांची गणितं चुकली तर काही उमेदवारांची गणितच बिघडल्याचे पाहायला मिळाले. मातब्बर नेत्यांना या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली. बाल्लेकिल्ल्यातच उमेदवार पराभूत झाले. विधानसभेच्या सतत दोन पंचवार्षिक निवडणूका सर करणारे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. तर सलग विधानसभेच्या चार निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जाणारे संजय देरकर यांनी या निवडणुकीत बाजी मारली. संजय देरकर यांच्या पराभवासाठी चहू बाजूंनी फिल्डिंग लावण्यात आली होती. परंतु संजय देरकर यांच्या झंझावातापुढे प्रतिस्पर्धी उमेदवारांची कोणतीच मोर्चेबांधणी यशस्वी ठरली नाही. संजय देरकर यांनी सर्वच बाबतीत वरचढ ठरत विजय खेचून आणला. त्यामुळे जय पराजयाच्या या राजकारणात कुठे ख़ुशी तर कुठे गम हे चित्र वणी मतदार संघात पाहायला मिळाले.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वणी मतदार संघ २०१४ पासून भाजपच्या ताब्यात गेला. भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हे सतत विधानसभेच्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झाले. राज्यात व केंद्रातही भाजपचेच सरकार असल्याने त्यांनी वणी मतदार संघासाठी कमालीचा विकास निधी खेचून आणला. मतदार संघात विकासकामांचा सपाटा लावला. शहरातील रस्ते त्यांनी गुळगुळीत केले. गावागावात फिल्टर पाण्याचे ऑरो बसवले . चौकाचौकात हायमाक्स लाईट लावले. एवढेच नाही सुरक्षा व्यस्थेच्या दृष्टीने शहरातील व शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या कार्यकाळात वणी वरोरा राज्य महामार्ग तयार झाला. चिखलगाव व वरोरा रेल्वे क्रॉसिंगवर उडाणपूलाचे काम सुरु झाले. भव्य क्रीडा संकुल उभारण्याचेही काम हाती घेण्यात आले आहे. न्यायालयाच्या भव्य इमारतीचाही प्रस्ताव त्यांनी मंजूर करवून घेतला. एवढेच नाही तर इमारतीच्या बांधकामाकरिता निधीही मंजूर झाला आहे. त्यांच्या कार्यकाळात वणी शहराचा कायापालट झाला. शहराचा चेहरा मोहराच बदलला. शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
मतदार संघात विकासाचं वारूळ उभं करतांना त्यांनी बांधकामांवर विशेष भर दिला. आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याकरिता त्यांनी कुठलेच प्रयत्न केले नाही. केंद्रात व राज्यात सरकार असतांनाही त्यांनी १० वर्षात उपजिल्हा रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावला नाही. खनिजातून कोट्यवधींचं उत्पन्न मिळवून देणारा हा तालुका उपजिल्हा रुग्णालयापासून आजही वंचितच आहे. आरोग्याच्या तोडक्या सुविधा तालुक्यात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही अतिशय दयनीय अवस्था आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. गंभीर आजारांवरील लसी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध राहत नाही. नेहमी औषधांचा तुटवडा असतो. रुग्णांना रेफर करणारं रुग्णालय म्हणून वणी ग्रामीण रुग्णालय ओळखलं जातं. असे असतांनाही आरोग्य व्यवस्था सुधारण्याकडे मुळीच लक्ष देण्यात आलं नाही. उच्च शिक्षणाची सुविधा याठिकाणी नाही. शासकीय पॉलिटेक्निक, इंजिनियरिंग कॉलेज, बीएड कॉलेज तालुक्यात नाही. व्यावसायिक शिक्षण, टेक्नॉलॉजी कोर्सेस, बीसीए, बीसीसीए, एमबीए, बीबीए हे शिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. तेथील खर्च सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून माघार घेऊ लागले आहेत. शहरात केवळ खाजगी शिक्षण संस्थांचं जाळं विणलं जात आहे. त्याचप्रमाणे या मतदार संघात रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देण्यात आले नाही. एकही मोठा कारखाना किंवा उद्योग तालुक्यात उभारण्यात आला नाही. इंदिरा सूत गिरणीचं भिजत घोंगडं पडलं आहे. त्यामुळे मतदार संघात बेरोजगारांच्या फौजफाटा तयार होऊ लागल्या आहेत.
त्यातल्या त्यात अवैध धंद्यांना दरम्यानच्या काळात प्रचंड ऊत आला. रेती तस्करी जोमात चालली. रेती तस्करीला अंकुश लावण्याकरिता कोणतंही ठोस पाऊल उचलण्यात आलं नाही. ऑनलाईन रेती विक्रीच्या नावावर रेतीचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात आला. रेती डेपो केवळ शोभेच्या वस्तू ठरले. ऑनलाईन नोंदणी करूनही कित्येकांना शासकीय दरात रेती मिळाली नाही. तर दामदुप्पट किंमतीत रेतीचा महापूर वाहतांना दिसला. रेती अभावी लाभार्थ्यांची घरकुलाची कामे रखडली. घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याकरिता कित्येक निवेदने व आंदोलने झाली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही प्रशासनाच्या धोरणाविरुद्ध निवेदने द्यावी लागली. शासनाने घरकुल लाभार्थ्यांना रेतीत प्राधान्य देण्याचे निर्देशही दिले होते. पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रेती धोरणात पारदर्शकता आली नाही. रेतीचा काळाबाजार थांबला नाही. अवैध रेती उत्खनन व अवैध मुरूम उत्खनन या काळात जोरात चालले. रेती व मुरूम तस्करीला अक्षरशः उधाण आले. पण याकडे लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला.
रस्त्यांची कामेही अत्यंत निकृष्ठ दर्जाची झाल्याची ओरड झाली. शहरातील मुख्य मार्गाचे बांधकाम करतांना शेकडो वर्षे जुनी कडू लिंबाची झाडे तोडण्यात आली. आधीच शहराला प्रदूषणाने विळखा घातला आहे. त्यात झाडांची कत्तल करून प्रदूषणाची पातळी वाढविण्यात आली. कोळशाच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य व शेतपिकंही धोक्यात आली. या विरोधात सत्ताधारी पक्षातीलच नेत्यांना वेळोवेळी आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागली. शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली. अनियमित व अशुद्ध पाणी पुरवठा शहरात करण्यात आला. शहरातील काही भागांना तर पाणी टंचाईची चांगलीच झळ सोसावी लागली. पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे निघाले. या सर्व बाबी विकासात बसल्या नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता नाराज होती. आणि हीच नाराजी मतदानातून दिसून आली.
वणी मतदार संघाच्या विकासाचे महामेरू ठरलेल्या संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. आरोग्य, शिक्षण व रोजगाराचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देण्यात आले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष दिल्या गेले नाही. सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या नाही. सर्वसामान्यांना न्याय देण्यात लोकप्रतिनिधी कमी पडल्याने त्यांच्या विरोधात सर्वसामान्यांचा आक्रोश दिसून आला. सर्वसामान्य नागरिक हक्काचे घर बांधण्यापासून वंचित राहिले. दरम्यानच्या काळात गुन्हेगारीही प्रचंड वाढल्याचे दिसून आले. चोरी, घरफोडी, दरोडा, हाणामारी एवढेच नाही खुनासारख्या घटनाही घडल्या. पोलिस प्रशासनासह शहर प्रशासनावरही लोकप्रतिनिधींचं कुठलंच नियंत्रण दिसून आलं नाही. कित्येक वर्षांपासून पोलिस कर्मचारी वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून आहेत. त्यांच्या बदल्या होतांना दिसत नाही. बदल्या झालेले पोलिस कर्मचारी लागेबांधे करून परत वणी व आसपासच्या पोलिस स्टेशनलाच बदली करून घेतात. वाहतूक उपशाखेसह उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस स्टेशनमध्ये काही पोलिस कर्मचारी अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसले असतांनाही याकडे लक्ष देण्यात आले नाही. अनेक वर्ष एकाच पोलिस स्टेशनमध्ये राहून त्यांचे स्नेह संबंध वाढले आहेत. त्यामुळे त्यांचे मधुर संबंध कार्यवाहीच्या आड येऊ लागल्याने गुन्हेगारी प्रचंड वाढली. या सर्व दुर्लक्षित बाबी लोकप्रतिनिधींना नडल्या. आणि त्यामुळेच त्यांना जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागला.
Comments
Post a Comment