आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त (२०२५) शहरात सहकार सप्ताह उत्साहात साजरा

प्रशांत चंदनखेडे वणी 

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ व सहकार मंत्रालय स्थापना दिन सहकार क्षेत्रात उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सर्व सहकारी संस्था व पतसंस्थांनी एकत्र येत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त शहरात सहकार सप्ताह साजरा केला. यावेळी विविध सामाजिक उपक्रमांसह भरगच्च कार्यक्रमही घेण्यात आले. या निमित्ताने शहरातील सर्व सहकारी संस्था व पतसंस्थांचे पदाधिकारी व अधिकारी एकाच मंचावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.  

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त शहरात ३० जून ते ६ जुलै पर्यंत सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. शहरातील सहकारी संस्था, पतसंस्था व सहाय्यक निबंधक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात सामाजिक उपक्रम व विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. २ जुलैला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक निबंधक सचिन कुळमेथे यांनी ई.क्यु.जे. ट्रेनिंग व सहकार कायद्याच्या कलम १०१ अंतर्गत ऑनलाईन दावा कसा दाखल करावा या संदर्भात पतसंस्थांना विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच केशव नागरी पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी दिपक दिकुंडवार यांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था पुणे यांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या परिपत्रकातील नागरी व ग्रामीण बिगर कृषी पतसंस्थांसाठीच्या कर्ज विषयक नियमांची सविस्तर माहिती दिली. ३ जुलैला शहरातील सर्व पतसंस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रमुख चौकांसह शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. 

४ जुलैला शहरात सहकार दिंडी काढण्यात आली. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त शासकीय मैदानावर विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मान्यवरांकडून उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक सचिन कुळमेथे हे होते. तर कार्यक्रमाला सहकार क्षेत्रात प्रगती साधलेल्या श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, उपाध्यक्ष विवेक मांडवकर, केशव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल अक्केवार, संचालक विनय कोंडावार, जय जगन्नाथ मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष संजय खाडे, गुरुदेव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, आदर्श नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष स्वप्नील गोहोकार, चार्टर्ड अकाऊंटंट अनिल झाबक यांच्यासह सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सीईओ दिपक दिकुंडवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांनी केले. त्यानंतर सहकार दिंडीचा समारोप करतांना केंद्र सरकारच्या एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. 

५ जुलैला रंगनाथ चेंबर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. रक्त संकलनाची जबाबदारी लाईफ लाईन रक्तपेढी नागपूरच्या चमूंनी पार पाडली. त्याचबरोबर आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष तथा शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ स्वप्नील गोहोकार यांनी पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व सभासदांची मोफत नेत्र तपासणी केली. एकूणच विविध सामाजिक उपक्रम राबवून तथा भरगच्च कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त शहरात सहकार सप्ताह साजरा करण्यात आला.   

सहकार सप्ताहाच्या यशस्वीतेकरिता श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था, केशव नागरी पतसंस्था, व्यापारी मित्र पतसंस्था, धनलक्ष्मी पतसंस्था, लक्ष्मीनारायण पतसंस्था, नेर अर्बन पतसंस्था, श्री लक्ष्मी पतसंस्था, गुरुदेव नागरी सह. पतसंस्था, नवोदय अर्बन पतसंस्था, भारती मैंद पतसंस्था, गोविंदस्वामी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खरेदी विक्री संघ, यवतमाळ अर्बन बँक, पुसद अर्बन बँक, वणी तालुक्यातील कर्मचारी सहकारी पतसंस्था, ग्रा.वि.का. सह. संस्था आदी सहकारी संस्था व पतसंस्थांच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी