Latest News

Latest News
Loading...

मध्यरात्री चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक पोलिसांनी पकडले, तीन जणांना अटक तर ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

विना परवाना चोरट्या मार्गाने मध्यरात्री रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांवर पोलिसांनी कार्यवाही करून दोनही ट्रक ताब्यात घेतले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून वणी येथे चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकाला अलर्ट करून लालगुडा चौपाटी परिसरात नका बंदी करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस पथकाने १३ नोव्हेंबरला रात्री १.३० वाजता विना परवाना रेतीची वाहतूक करणारे दोनही हायवा ट्रक ताब्यात घेत ट्रक चालकांना अटक केली. तसेच रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकांना दिशा निर्देश करणारे चारचाकी वाहन व वाहन चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

वाळू माफियांकडून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. रेती तस्करीच्या या गोरख धंद्यात अनेक नामांकित व्यक्ती उतरले आहेत. पांढरपेशी लोकही रेतीचा काळाबाजार करू लागले आहेत. रेती तस्करीतून अनेक जण गब्बर झाले आहेत. विविध शकली लढवून वाळू माफिया रेतीची तस्करी करतांना दिसत आहे. रेती तस्करीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असून खनिज चोरीतून चोरटे मालामाल होऊ आहेत. गौण खनिजाची चोरी करून चोरटे  शासनाच्या महसुलावर डल्ला मारू लागले आहेत. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून वाळू माफियांचे रात्रीचे खेळ सुरु आहेत. झटपट श्रीमंत होण्याची ओढ अनेकांना अवैध धंद्यांकडे आकर्षित करू लागली आहे. काळ्या बाजारातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा मिळवता येत असल्याने कुणालाही धीरज राहिलेला नाही. झटपट मालदार होण्याची जणू स्पर्धा लागली असून नामांकित व्यक्तीही अवैध धंद्यात उतरू लागले आहेत. अवैध धंदे करणाऱ्यांचे पाठीराखे कधी राजकीय दबाव आणून तर कधी प्रशासनाचे हितचिंतक बनून त्यांचं संरक्षण करीत आहेत. काहींनी तर अवैध धंदे करणाऱ्यांची पाठराखण करण्याकरिता लेखणीचा आधार घेतला आहे. रेती तस्करीचं जाळं तालुक्यात मोठ्या प्रमाणात पसरलं आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातून वणी येथे चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक होत असल्याची विश्वसनीय माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळाली. दोन हायवा ट्रक अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असून एक चाकी वाहन रस्त्यावर पाळत ठेऊन असल्याचे सूत्रांनी सांगितले. या माहितीच्या आधारे ठाणेदारांनी पोलिस पथकाला अलर्ट करून लालगुडा चौपाटी परिसरात सापळा रचण्याच्या सूचना दिल्या. पोलिस पथकाने रात्री त्याठिकाणी सापळा रचून सांगितलेल्या वर्णनाच्या वाहनांकडे बारीक लक्ष ठेवले. रात्री १.३० वाजताच्या सुमारास त्यांना एक पांढऱ्या रंगाची बुलेरो व मागून दोन ट्रक वणीकडे येतांना दिसले. पोलिस पथकाने बुलेरो व दोनही ट्रक थांबवून त्यांची झडती घेतली असता ट्रकांमध्ये रेती भरून असल्याचे आढळले. ट्रक चालकांना रेतीचा परवाना व वाहतुकीची पावती मागितली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिस पथकाने रेती भरलेले दोन्ही ट्रक व बुलेरो वाहन ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. तसेच ट्रक चालक स्वप्नील बीजांकुर वेलादे (२७), अक्षय परशुराम पेंदोर (२७) दोघेही रा. बेर्डी जि. चंद्रपूर, तथा बुलेरो चालक रामप्रसाद भिकाराम चौधरी (४५) रा. वरुर जि. चंद्रपूर यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी घटनास्थळावरून दोन १६ चाकी हायवा ट्रक (MH ३४ BZ १५१४, MH ३४ BZ १५१७) किंमत ८० लाख रुपये, १६ ब्रास रेती किंमत ८० हजार रुपये, एक बुलेरो वाहन (MH ३४ CD २६३५) किंमत १० लाख रुपये असा एकूण ९० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप एसडीपीओ गणेश किंद्रे, यंकच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, पोलिस अमलदार सुहास मंदावार, डीबी पथकाचे विकास धडसे, सागर सिडाम यांनी केली. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव करीत आहे.  

No comments:

Powered by Blogger.