प्रशांत चंदनखेडे वणी
छोटा हाथी हे मालवाहू वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला नाल्यात उलटल्याची घटना २७ जूनला दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील सावर्ला गावाजवळ घडली. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नसून चालक व अन्य एकाला किरकोळ मार लागला आहे. चालक हा मद्य प्राशन करून वाहन चालवीत असल्याचे सांगण्यात येते.
वणी कडून वरोराकडे भरधाव जात असलेले छोटा हाथी हे मालवाहू वाहन (MH ४० CT १९३२) सावर्ला गावाजवळ रस्त्याच्या कडेला नाल्यात पलटी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नाही. वाहन चालक व वाहनातील अन्य एकाला किरकोळ मार लागला आहे. अपघात घडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत वाहनातील दोघांनाही वाहनाबाहेर काढले. वाहन चालक हा मद्य प्राशन करून वाहन चालवीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
वाहतुकी संदर्भातील नियम व कायदे अधिकच कडक करण्यात आले असले तरी बेजाबदारपणे वाहने चालविणारे काही महाभाग कायद्यांना आव्हान देतच आहेत. नशा करून वाहने चालवून ते स्वतःचा व इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. भरधाव व निष्काळजीपणे वाहने चालविण्याने अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आणि त्यात निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जात आहे.
No comments: