प्रशांत चंदनखेडे वणी
वणी वरोरा राज्य महामार्गावरील रेल्वे फाटकाजवळ एक ट्रक चालक मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शनिवार २८ जूनला सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. श्रीचंद राजपूत बिहारी (शैला) वय अंदाजे ५० वर्षे रा. खंदला ता. वणी असे या मृत ट्रक चालकाचे नाव आहे. तो कुलवंत सिंग यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये ट्रक चालक म्हणून कामाला असल्याचे सांगण्यात येते. त्याला व्ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्याने प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याबद्दल ट्रान्सपोर्ट मालकाला फोनही केल्याचे त्याच्या सहकारी ड्रायव्हर मित्रांचे म्हणणे आहे.
श्रीचंद राजपूत हा मूळचा बिहार राज्यातील रहिवाशी असून तो अनेक वर्षांपासून खांदला येथे वास्तव्यास होता. तो अतिशय अनुभवी ट्रक चालक होता. सध्या तो कुलवंत सिंग यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये ट्रक चालवीत होता. कोलारपिंपरी कोळसाखाणीतून कोळसा भरून आणल्यानंतर त्याने वेकोलिच्या रेल्वे सायडिंगवर कोळसा खाली केला. त्यानंतर तो रेल्वे सायडिंगवरून मुख्य मार्गाकडे येत असतांना त्याने रेल्वे फाटकाजवळ ट्रक उभा केला. त्याचवेळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने ट्रान्सपोर्ट मालकाला फोन केला. मात्र तेवढ्यातच व्ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.
चालता फिरता व्यक्ती क्षणात मृत्युमुखी पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सर्वांशी हसतमुख असणारा शैला अचानक सर्वांना सोडून गेल्याने ट्रक चालकांमध्ये शोककळा पसरली आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा असा हा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रेल्वे सायडिंग हद्दीत (ट्रक चालक कामावर असतांना) ही घटना घडल्याने त्याच्या कुटुंबाला वेकोलि तथा ट्रान्सपोर्ट कंपनी कडून अर्थसहाय्य मिळावे, अशी ट्रक चालक व कुटूंबीयांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची अजून निश्चिती झालेली नाही. शवविच्छेदन अहवालातून त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
No comments: