तालुक्यात रेती तस्करीला सुकाळ, तस्करांचा रेती तुमच्या दारी हा धाडसी प्रयोग सुरूच, पैसे मोजा आणि रेती टंचाई विसरा
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यात रेती तस्करीला अक्षरशः उधाण आले आहे. अवैधरित्या रेतीची वाहतूक करून ती सर्रास काळ्या बाजारात विकली जात आहे. रेतीचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असतांना प्रशासन मात्र रेती तस्करीला पायबंद लावण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील रेती घाटांवरून सुरु असलेल्या रेती तस्करीला आता लगतच्या जिल्ह्यातील रेती तस्करांची जोड मिळाली आहे. लगतच्या जिल्ह्यातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे रेतीचा पुरवठा होतांना दिसत आहे. तालुक्यात अवैध रेतीचा महापूर वाहत असतांना महसूल विभाग मात्र रेतीच्या एखादं दोन ट्रकांवर कार्यवाही करून आपले टार्गेट पूर्ण करून घेत आहे. वणी तालुका रेती तस्करीचा हॉसस्पॉट बनला असतांनाही रेती तस्करीवर रोख लावण्यात प्रशासनाकडून कुठलेही ठोस प्रयत्न होतांना दिसत नाही.
वणी तालुक्यातील रेती घाटांबरोबरच आता लगतच्या जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. शहरात अवैध रेतीचा महापूर वाहत आहे. रेती भरलेले हायवा ट्रक शहरात बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी दिवसाढवळ्या रेती खाली करून जात आहेत. शहरातील रस्त्यांवरून रेतीची अवैध वाहतूक सुरु असतांना ती महसूल विभागाला दिसू नये, याचेच नवल वाटते. बसस्थानकामागे असलेल्या एका परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु असून येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकांच्या दिवसातून कित्येक तरी फेऱ्या होतात. संविधान चौक मार्गे अवैध रेती वाहतुकीचे ट्रक शहरात येत असतांनाही ते महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. वणी वरोरा व वणी चारगाव चौकी मार्गाने रेतीची सर्रास अवैध वाहतूक सुरु आहे. पण महसूल विभाग डोळ्यावर पट्टी बांधून असल्याचे दिसून येत आहे.
महसूल विभागाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांवर नुकतीच कार्यवाही केली. परंतु एखादं दोन ट्रकांवरच कार्यवाही करून महसूल विभाग धन्यता मानत आहे. रेती तस्करीला पायबंद लावण्याकरिता कोणतेही ठोस प्रयत्न महसूल विभागाकडून होतांना दिसत नाही. शासनाच्या कोट्यवधींच्या महसुलावर तस्कर डल्ला मारत असतांनाही तस्करांवर जरब बसविण्यात महसूल विभाग कमी पडतांना दिसत आहे. शहरात बांधकामाच्या ठिकाणी रेतीचे ढिगारे दिसून येतात. वणी तालुक्यातील रेती घाट बंद असतांनाही शहरात रेतीचा मुबलक पुरवठा होतच आहे. तरीही महसूल विभाग तस्करांच्या कुंडल्या शोधण्यात स्वारस्य दाखवायला तयार नाही, हे आकलनापलीकडे आहे. वाळू माफिया प्रशासनाला न जुमानता रेती तस्करीला अंजाम देत आहेत. त्यामुळे तालुक्यात वाळू माफियाराज आले की काय, असे वाटू लागले आहे. वाळू तस्कर आता महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून नाही तर हितसंबंध जोपासून वाळू तस्करी करीत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. त्यामुळे वाळू तस्करीवर महसूल विभाग रोख लावेल काय, असा प्रश्न आता शहरवासियांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
No comments: