Latest News

Latest News
Loading...

शाळेच्या प्रवेशोत्सव सोहळ्यात आमदार संजय देरकरही विद्यार्थ्यांमध्ये रमले


प्रशांत चंदनखेडे वणी 

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने विद्यार्थ्यांची पाऊले शाळेकडे वळू लागली आहेत. शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट दिसू लागला आहे. विद्यार्थ्यांच्या आगमनाने शाळा गजबजून उठल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत शुकशुकाट असलेल्या शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांचा कल्लोळ व रेलचेल दिसू लागली आहे. शाळा सुरु झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांचे आगळे वेगळे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये मिसळून वेळोवेळी त्यांचा उत्साह वाढवितात. त्यातच दोन महिन्यांच्या विश्रांती नंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या शिक्षकांनी शाळेतच स्वागत सोहळ्याचे आयोजन केले. या आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थीही भारावून गेले. मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील आश्रम शाळेतही वैशिट्यपूर्ण असा प्रवेशोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. विद्यार्थ्यांचा शिक्षणाप्रतीचा उत्साह वाढविण्याकरिता ते चक्क विद्यार्थ्यांमध्ये रमले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवश्यकता व महत्व पटवून दिले. या सोहळ्यादरम्यान त्यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबतही माहिती देण्यात आली. 
उन्हाळी सुट्यांचा काळ संपल्यानंतर नियमित शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांनीही शाळेचा रस्ता धरला आहे. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटांनी शाळा गजबजून उठल्या आहेत. शाळेच्या वातावरणात विद्यार्थी रमायला लागले आहेत. दोन महिन्यांच्या विश्रांती नंतर वर्ग खोल्यांमध्ये पाऊल ठेवणारे विद्यार्थी वर्ग मित्रांच्या भेटीने गदगदून गेले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीतील आठवणी ते मित्रांसोबत शेअर करू लागले आहेत. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वर्ग मित्रांशी भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्यातच शाळेने केलेलं त्यांचं आगळंवेगळं स्वागत, यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते. काही शाळांनी तर विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला. शाळेत विद्यार्थ्यांचं थाटात स्वागत करण्यात आलं. 
मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतही स्मरणात राहील असा प्रवेशोत्सव सोहळा आयोजित केला होता. विद्यार्थ्यांचं स्वागत करतांनाच त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा दिमाखदार प्रवेशोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला आमदार संजय देरकर यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी बनून ते काही क्षण विद्यार्थ्यांमध्ये रमले. विद्यार्थ्यांसोबत गप्पा गोष्टी करतांनाच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी शिक्षणाशी सांगड घालावी, असा त्यांनी विद्यार्थ्यांना उपदेश दिला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. नंतर आमदार संजय देरकर यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देण्यात आले. 

No comments:

Powered by Blogger.