प्रशांत चंदनखेडे वणी
विदर्भ ॲग्रिकल्चरल ॲण्ड अलाईड प्रोडूसर कंपनी (व्यापको) नागपूरच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत नाफेड मार्फत २०२३ या हंगामात चना खरेदी करतांना कंपनीचे उत्कृष्ठ व्यवस्थापन, नियोजन व कास्तकारांची कसलीही गैरसोय होऊ न देता त्यांच्या खात्यावर चुकाऱ्याचे तत्काळ पैसे जमा केल्याबद्दल रंगनाथ स्वामी फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड वणीचे अध्यक्ष संजय खाडे यांचा नागपूर येथे सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मान करण्यात आला. व्यापकोच्या ५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या पारितोषिक वितरण समारंभात कंपनीला मोठ्या प्रमाणात चना खरेदी करून दिल्याबद्दल संजय खाडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. वसंत नाईक स्मृती सभागृह वनामती परिसर नागपूर येथे हा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, व्याख्याते चंद्रशेखर भडसावळे, श्रीकांत कुळवेकर, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, प्रकल्प सहसंचालक (आत्मा) अर्चना कडू (नागपूर), नोडल अधिकारी प्रज्ञा गोळघाटे, नागपूर कृषी विभागाचे अधीक्षक रवींद्र मनोहरे, रेशीम संचालनालय नागपूरचे उपसंचालक ए.बी. ढवळे, व्यापको कंपनीचे संचालक राजेश उरकुडे, धनंजय उरकुडे, ईश्वर खाडे आदी उपस्थित होते.
रब्बी हंगाम २०२३ या हंगामात किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत नाफेड मार्फत रंगनाथ स्वामी फार्मर्स प्रोडूसर कंपनीने मोठ्या प्रमाणात चना खरेदी करून चुकाऱ्याची रक्कम तात्काळ कास्तकारांच्या खात्यात जमा केली. चना खरेदी करतांना खरेदी केंद्रावर कास्तकारांची कसलीही गैरसोय होऊ दिली नाही. चना खरेदी दरम्यान उत्कृष्ट व्यवस्थापन व नियोजन केले. संजय खाडे यांच्या उत्तम व्यवस्थापनाची दखल घेत व्यापको कंपनीच्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांना उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना हा सन्मानजनक पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments: