स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केला धाडसी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, डोळ्यात मिरची पॉवडर झोकून उडविली होती रोख रक्कम
प्रशांत चंदनखेडे वणी
डोळ्यात मिरची पावडर झोकून वाईन शॉप मालकाची रोख रक्कम पळविणाऱ्या संशयीत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केल्यानंतर त्याला पोपटासारखं बोलतं केलं. त्याने गुन्ह्याची कबुली देतांनाच आपल्या अन्य साथीदारांचीही नावे सांगितली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाडसी चोरी करणाऱ्या आठ आरोपींना अटक करीत अट्टल चोरट्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच गुन्हे शाखा पथकाने या टोळीचे तीन धाडसी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आठ आरोपींमध्ये एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.
पांढरकवडा येथील कर्मचारी वसाहतीत वास्तव्यास असलेल्या हनुमंत नरसया कदिरेवार यांचे पांढरकवडा येथेच बोरले वाईन शॉप नावाने दारू विक्रीचे दुकान आहे. ३ ऑक्टोबरला रात्री वाईन शॉप बंद करून ते घरी आले. दिवसभरात दारू विक्रीतुन जमा झालेली रक्कम त्यांनी मोपेड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. घराच्या कम्पाऊंडचे गेट उघडण्याकरिता त्यांनी गेट जवळ दुचाकी उभी केली. चाबी दुचाकीलाच लागलेली होती. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती त्यांना दुचाकीवर बसतांना दिसला. अपरिचित व्यक्ती दुचाकीवर बसल्याचे पाहून ते क्षणात दुचाकीकडे वळले. त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या डोळ्यात मिरची पॉवडर झोकली. डोळ्यात मिरची पावडर झोकून ते दोघेही दुचाकी चोरून नेत असतांना हनुमंत कदिरेवार यांनी त्याही अवस्थेत त्यांचा पाठलाग केला. पण दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्यावर चाकूने वार केला. चाकूचा वार त्यांच्या तळहाताला लागल्याने तळहाताला मोठी दुखापत झाली. चाकूने हल्ला चढवून चोरटे दुचाकी व डिक्कीत ठेवलेली २ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाले. अचानक घडलेल्या घटनेने हादरलेले हनुमंत कदिरेवार यांनी ४ ऑक्टोबरला पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा शीघ्र तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पांढरकवडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाला दिले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास हाती घेत तांत्रिक बाबी तपासल्या. खबऱ्यांची मदत घेत ते संशयीतांपर्यंत पोहचले. संशयीताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच यापूर्वीही दोन धाडसी चोऱ्या केल्याचे कबूल करीत चोऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या अन्य साथीदारांचीही त्याने नावे सांगितली. पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या आठ आरोपींना अटक करीत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केलेल्या संशयिताला पोपटासारखे बोलते करीत त्याने व त्याच्या साथीदारांनी इतरही ठिकाणी केलेले चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. यापूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यात त्यांनी तक्रारकर्त्यावर हल्ला चढवून १ लाख ७६ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला होता. तर एका धाडसी चोरीत १ लाख ७८ हजार रुपये रोख, एक टॅब व सीजीटी असा एकूण १ लाख ८५ हजार २६८ रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला होता. या अट्टल चोरट्यांची एक टोळीच शहरात सक्रिय होती. त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याने त्यांची नावे गुपित ठेवण्यात आली आहेत. वाईन शॉप मालकाची त्याच्या घराजवळून दुचाकी व त्यात ठेवलेली रक्कम उडविण्याचं धाडस केल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. डोळ्यात मिरची पॉवडर झोकून व चाकू हल्ला करून फिल्मी स्टाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांची टोळीच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गजाआड केली आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ रामेश्वर वैजंने, स्था.गु.शा.पो.नि. आधारसिंग सोनोने, ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा. सपोनि अतुल मोहनकर, अमोल मुडे, पो.अ. सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, भोजराज करपते, नरेश राऊत, सतीश फुके, सपोनि योगेश रंधे, नितीन सुशीर, पो.अ. प्रमोद जुनूनकर, अंकुश बहाळे, मारोती पाटील, सचिन काकडे, छंदक मनावार, राजू बेलेवार, राजू मुत्तेलवार, सूर्यकांत गीते यांनी केली.
No comments: