Latest News

Latest News
Loading...

विदर्भा नदीला आला पूर, नदीच्या पुलावरून चक्क वाहन गेले वाहून, एक वाचला तर एकाचा दुर्दैवी मृत्यू

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

विदर्भा नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहू लागले. पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने टाटा मॅजिक वाहनासह दोन जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी एकाला वाचविण्यात आले. तर एकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना २७ मे ला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. रामा कनाके (५५) रा. उमरी असे या दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या इसमाचे नाव आहे.  

पावसाळा सुरु होण्यापूर्वीच पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांपासून संततधार व मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. मंगळवारी जोरदार पाऊस पडल्याने विदर्भा नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. विदर्भा नदी उफाण मारू लागली. नदीने धोक्याची पातळी गाठली. अशातच विदर्भा नदीला पूर आल्याने कायर-पठारपूर मार्गावरील कोसारा घाटातील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले. याच दरम्यान झरी तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रवासी भाडे मारून उमरीकडे परतणारे टाटा मॅजिक वाहन नदीचा पूल पार करतांना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. 

पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा चालकाला अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली. पुलावरून पाणी वाहत असतांना चालकाने नदीचा पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असल्याने टाटा मॅजिक वाहन नदीच्या प्रवाहात वाहून गेले. वाहन नदीत वाहून जात असतांनाच चालकाच्या बाजूच्या सीटवर बसून असलेल्या भास्कर कुसाम (५०) याने वाहनातून उडी मारली. त्यामुळे त्याचा जीव वाचला. तर वाहन चालक रामा कनाके याला बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. विदर्भा नदीला पूर आल्याने गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात नदीच्या पुलाजवळ जमा झाले होते. अशातच नदीच्या पुलावरून वाहन वाहून जात असल्याचे दिसताच उपस्थितांपैकी काही लोकांनी डायल ११२ वर फोन केला. ११२ वर फोन येताच शिरपूर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. शिरपूर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने नदीत वाहून जाणाऱ्या एकाला वाचविले तर एक जण वाहनासह वाहून गेला. 
 
त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत नदी पात्रात शोध मोहीम राबविली. पोलिसांनी पहाटे ३ वाजता पुरात वाहून गेलेल्या वाहन चालकाचा मृतदेह नदी बाहेर काढला. वाहन चालक रामा कनाके याचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. रामा कनाके याने तीन महिन्यांपूर्वीच टाटा मॅजिक वाहन खरेदी केले होते. प्रवासी भाड्यावर तो वाहन चालवायचा. डोंगरगाव येथील प्रवासी भाडे मारून तो परतत असतांना ही दुर्दैवी घटना घडली. रामा कनाके याच्या पश्चात पत्नी व तिने मुले असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
पावसाळ्यापूर्वीच नदीला आलेल्या पुरात चक्क एक वाहन वाहून गेल्याने एकाचा बळी गेला. पूर बळीची ही  घटना घडल्याने प्रशासनही आता अलर्ट मोडवर आलं आहे. पूर परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचं नियोजन करण्याकरिता प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र हाहाकार माजविल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 

No comments:

Powered by Blogger.