Latest News

Latest News
Loading...

चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, एलसीबी पथकाने चोरट्यांना मध्यप्रदेशातून केली अटक, १६ किलो चांदी केली जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

ट्रॅव्हल्स मधून एका सराफा व्यावसायिकाची चांदीचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २२ मे ला रात्री ११ वाजताच्या सुमारास मोहदा येथील हिंदुस्थानी ढाब्यावर घडली. सराफा व्यावसायिकाने याबाबत २४ मे ला पांढरकवडा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या चोरी प्रकरणाचा जलद छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा पथकाला दिले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या काही दिवसांतच या चोरी प्रकरणाचा छडा लावला. सराफा व्यावसायिकाची चांदीचे दागिने असलेली बॅग लंपास करणाऱ्या चोरट्यांना एलसीबी पथकाने मध्यप्रदेश येथून अटक केली. त्यांच्या जवळून १६ किलो १६८ ग्राम वजनाचे चांदीचे दागिने ( किंमत ६ लाख ६८ हजार ७८८ रुपये) एलसीबी पथकाने जप्त केले आहे. 

तेलंगणा राज्यातील किसरा दमईगुडा येथील सराफा व्यावसायिक प्रतिक प्रदिप कोटक यांनी यवतमाळ येथील जिगणेश जयंतीलाल हिंडोच्या या सुवर्ण व्यापाऱ्याकडून १६ किलो ८२७ ग्राम (किंमत ८ लाख १२३ रुपये) वजनाचे चांदीचे दागिने खरेदी केले. त्यानंतर ते रात्री विजय ट्रॅव्हल्सने (एनएल ०१ बी २९०१) तेलंगणा राज्यातील आपल्या गावाकडे जाण्यास निघाले. एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये त्यांनी सर्व दागिने ठेवले होते. दरम्यान मोहदा येथील हिंदुस्थानी ढाबा येथे ट्रॅव्हल्सने थांबा घेतला. त्यामुळे प्रतिक कोटक हे दागिन्यांची बॅग सीटवर ठेऊन वॉशरूम करीता ट्रॅव्हल्स मधून खाली उतरले. त्यानंतर ते ट्रॅव्हल्स मधील आपल्या सीट जवळ गेले असता त्यांना दागिन्यांची बॅग सीटवर आढळून आली नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यांना काहीही सुचेनासे झाले. ते घाबलेल्या अवस्थेतच रात्री घरी परतले. त्यानंतर त्यांनी २४ मे ला पांढरकवडा पोलिस स्टेशनला येऊन दागिन्यांची बॅग चोरीला गेल्याची रीतसर तक्रार नोंदविली.

प्रतिक कोटक या सराफा व्यावसायिकाचे ८ लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल होताच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या चोरी प्रकरणाचा शीघ्र छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा पथकाला दिले. त्यामुळे एलसीबी पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून वेगवान तपास केला. हिंदुस्थानी ढाब्यावरील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना तीन अज्ञात इसम विना क्रमांकाच्या क्रेटा कारमध्ये बॅग चोरी करून नेतांना दिसले. त्यामुळे एलसीबी पथकाने सर्व खबऱ्यांना अलर्ट केले. अशातच हे तीनही चोरटे मध्यप्रदेश राज्यातील पटेलपुरा लून्हेरा (बुजुर्ग) ता. मनावर जि. धार येथील रहिवाशी असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली. या माहिती वरून एलसीबी पथक तात्काळ मध्यप्रदेश येथे रवाना झालं. तेथे आरोपींचा शोध घेऊन मोला खान रोशन खान (३८) रा. पटेलपुरा लुन्हेरा (बुजुर्ग) ता. मनावर जि. धार याला मोठ्या शिताफीने अटक केली. 

त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवून त्याला पोपटासारखे बोलते केले. त्याच्या तोंडून त्याच्या अन्य दोन साथीदारांची नावेही एलसीबी पथकाने वदवून घेतली. मोला खान याने मुस्ताख उर्फ चिलू शमशेर खान व शारुख खान रमजान खान दोन्ही रा. खेरवा जि धार यांच्या सोबत मिळून दागिन्यांची बॅग चोरी केल्याची कबुली दिली आहे. एलसीबी पथकाने त्याच्या जवळून त्याने चोरी केलेला मुद्देमालही जप्त केला. चोरट्यांनी सराफा व्यावसायिकावर पाळत ठेऊन त्यांची चांदीच्या दागिन्यांची बॅग अलगद लंपास केली. पण एलसीबी पथकानेही कौशल्यपूर्ण तपास करून चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. तसेच ७ लाख ६८ हजार ७८८ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांजवळून जप्त केला. एलसीबी पथकाने चोरट्यांना पांढरकवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक सतिश चवरे, सपोनि अजय कुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके, पोलिस अंमलदार सुनिल खंडागडे, सुधिर पांडे, उल्हास कुरकुटे, सुधिर पिदूरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, सतिश फुके, नरेश राऊत यांनी केली.    

No comments:

Powered by Blogger.