Latest News

Latest News
Loading...

बाजार समितीच्या गाळ्यांचा जाहीर लिलाव ढकलला पुढे, खरेदीदारांनी लिलावाकडे फिरविली पाठ


प्रशांत चंदनखेडे वणी 

दीर्घ कालावधी नंतर गाळे लिलावाचा मुहूर्त निघाला. पण खरेदीदारांनी लिलावाकडे पाठ फिरविल्याने लिलावच पुढे ढकलण्याची वेळ बाजार समितीवर आली. ११ ऑक्टोबरला बाजार समितीच्या गाळ्यांचा लिलाव होणार होता. पण गाळे खरेदी करण्यास खरेदीदार इच्छुक नसल्याने लिलाव पुढे ढकलण्यात आला. बाजार समितीच्या गाळे लिलावात खरेदीदारांनी भाग घेणेच टाळले. जेवढे गाळे तेवढेही अर्ज विक्री न झाल्याने गाळ्यांचा जाहीर लिलाव रद्द करण्यात आला. बाजार समितीच्या गाळे लिलावाला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने लिलावच पुढे ढकलण्याची नामुष्की बाजार समितीवर ओढावली. गाळ्यांच्या जाहीर लिलावाची बाजार समितीने विविध माध्यमातून मोठी जाहिरात केली. पण त्यानंतरही गाळे लिलावाला खरेदीदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने लिलाव प्रक्रियाच पुढे ढकलण्यात आली. 

कृषी उत्पन्न बाजार समितीचा गाळे लिलाव अनेक दिवसांपासून रखडला होता. दीर्घ कालावधी नंतर महाराष्ट्र राज्य पणन महासंघाने गाळे लिलावाचा मार्ग मोकळा करून दिला. गाळे लिलावाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक जण गाळ्यांच्या जाहीर लिलावाचा मुहूर्त निघाल्याने उत्साही दिसून आले. गाळे लिलावात सहभागी होऊन बोली लावण्याची अनेकांनी इच्छा व्यक्त केली. गाळे खरेदी करून छोटा मोठा व्यवसाय थाटण्याची मानसिकता असलेल्यांचा मोठा अपेक्षा भंग झाला. जाहीर लिलावात बोली लावण्याकरिता घ्याव्या लागणाऱ्या अर्जाची किंमतच २००० रुपये ठेवण्यात आली. अर्जासोबत २ लाखांचा डिमांड ड्राफ्ट द्यायचा होता. गाळ्यांची बोली ५ लाखांपासून सुरु होणार होती. आणि त्यात आणखी भर म्हणजे गाळ्यांचा मासिक किराया ५ हजार रुपये ठेवण्यात आला. २९ वर्षांसाठी हे गाळे लीजवर देण्यात येणार होते. एकूण ७८ गाळ्यांचा लिलाव होणार होता. गाळ्यांचा मासिक किराया ५ हजार रुपये ठेवण्यात आल्याने अनेकांनी या जाहीर लिलावाकडे पाठ फिरविली. गाळे मुख्य बाजारपेठेपासून दूर असल्यानेही अनेकांनी जोखीम पत्करणे टाळले. अनुसूचित जाती व जमाती करीता गाळे राखीव ठेवण्यात न आल्याने हा प्रवर्ग लिलावापासून दूर राहिला. एकूणच बाजार समितीच्या अटी शर्ती जाचक असल्याने इच्छा असतांनाही खरेदीदारांनी लिलावात भाग घेणे टाळले. बाजार समितीचे गाळे खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरल्याने त्यांनीही लिलावात भाग न घेणेच पसंत केले. मागास्वर्गीयांकरिता गाळे आरक्षित ठेवण्याला बगल देण्यात आल्याने त्यांच्यातही नाराजीचा सूर उमटत होता. एकूणच बाजार समितीच्या गाळे लिलावात इच्छुकांचा अपेक्षा भंग झाल्याने त्यांनी जाहीर लिलावाकडे पाठ फिरविली. परिणामी बाजार समितीवर जाहीर लिलावच पुढे ढकलण्याची वेळ आली. आता हा गाळ्यांचा लिलाव केंव्हा होतो, व लिलाव प्रक्रियेत काय बदल केले जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

No comments:

Powered by Blogger.