न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना, अटकपूर्व जामीन मिळालेल्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांनी पाळला नाही न्यायालयाचा आदेश
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांवर शासकीय निधीचा गैरवापर केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी केळापूर सत्र नायायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने काही अटी शर्तींवर त्यांना जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर पाच दिवस या सर्वांना वणी पोलिस स्टेशन येथे हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. परंतु या कालावधीत वैद्यकीय अधीक्षकांसह पाचही जणांनी वणी पोलिस स्टेशनला हजर न राहून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या पाचही जणांची चौकशी करून त्यांचा जामीन रद्द करण्याबाबतचा अहवाल न्यायालयाला पाठविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोना काळात रुग्णसेवेच्या नावाखाली वैद्यकीय क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या अनेकांनी आपले हात ओले करून घेतले. कोरोना काळ वैद्यकीय क्षेत्रासाठी आर्थिक लाभ देणारा ठरला. कोरोना काळात वॆद्यकीय क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल झाली. वणी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारीही यात मागे राहिले नाही. कोविडची तीव्रता लक्षात घेता वणी ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केयर युनिटच्या इमारतीत स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. कोविड सेंटर मधील रुग्णांना उपचारार्थ हलविण्याकरिता रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था करून देण्यात आली होती. या रुग्णवाहिकेचा चालक असलेल्या कन्हैया उर्फ करण विठ्ठल गेडाम याची कोविड सेंटरमध्येही कंत्राटी तत्वावर ऑक्सिजन ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची बाब समोर आली होती. करण गेडाम हा रुग्णवाहिका चालक म्हणून १२ तास तर ऑक्सिजन ऑपरेटर म्हणून १६ तास कर्तव्य बजावत असल्याचे दर्शविण्यात आले होते. करण गेडाम हा तब्बल २८ तास ग्रामीण रुग्णालयात सेवा देत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्याने सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी या प्रकाराची चौकशी केली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात गौडबंगाल सुरु असल्याचे निदर्शनास आले. एकच व्यक्ती दोन पदांवर कार्यरत असल्याचे दाखवून त्याच्या नावावर वेतन लाटण्यात येत असल्याचे रवींद्र कांबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कागदोपत्री पुरावे गोळा करून न्यायालयात धाव घेतली. रुग्णवाहिका चालकाला ऑक्सिजन ऑपरेटर म्हणून नियुक्ती देऊन त्याच्या नावाने वेतन काढण्यात आल्याने हा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा प्रश्न उपस्थित करून त्यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यांनाही हा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी तसा अहवाल न्यायालयाला पाठविला. त्यानुसार शासकीय निधीचा गैरवापर केल्या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धमेंद्र सुलभेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलाकर पोहे, अधिपरिचारिका जयश्री इंगोले, लिपिक सतिश जोगी व चालक करण गेडाम यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
गुन्हे दाखल झाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांसह पाचही जणांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केळापूर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. केळापूर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काही अटी शर्तींवर २८ जुलैला त्यांना जामीन मंजूर केला. २८ जुलै पासून पुढील पाच दिवस त्यांना वणी पोलिस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु ते मात्र पोलिस स्टेशनला हजर राहिले नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिस स्टेशनला हजर न राहून त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असल्याची तक्रार रवींद्र कांबळे यांनी केली आहे. जवळपास ४० दिवस ते पोलिस स्टेशनला हजर झाले नाही. वैद्यकीय सेवेतील व्यस्तता सांगून त्यांनी न्यायालयाचा आदेश पाळला नाही. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याऱ्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाचही जणांची चौकशी करून त्यांची जमानत रद्द करण्याबाबतचा अहवाल न्यायालयाला पाठविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

No comments: