विदर्भातील सर्वात मोठ्या सिमेंट उत्पादन कंपनीत मनसेची कामगार सेना गठीत, शेकडो कामगारांनी स्वीकारले सदस्यत्व
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी उपविभागात रिलायन्स उद्योग समूहाचा आर.सी.सी.पी.एल. हा सिमेंट उत्पादन प्रकल्प सुरु झाल्याने शेकडो युवकांना याठिकाणी रोजगार प्राप्त झाला आहे. या सिमेंट उत्पादन कंपनीमुळे वणी उपविभागातील बेरोजगारीचा आलेख कमी झाला असून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या वाटा उपलब्ध झाल्या आहेत. या कंपनीत विविध पदांवर कार्यरत असलेले कर्मचारी व कामगारांच्या हितांचे रक्षण करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी आर.सी.सी.पी.एल कंपनीमध्ये कामगार सेनेची स्थापना करून कामगारांचं संगठन तयार केलं आहे. कर्मचारी व कामगारांच्या हक्क, अधिकारांवर गदा येऊ नये, व स्थानिकांना या कंपनीत रोजगार मिळावा याकरिता मनसेची कामगार सेना या ठिकाणी गठीत करण्यात आली आहे. या सिमेंट उत्पादन कंपनीत कार्यरत असलेल्या शेकडो कामगारांनी मनसेच्या कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. शहरातील श्रीराम मंदिर येथे घेण्यात आलेल्या सोहळ्यात या कंपनीतील कामगारांना मनसेच्या कामगार सेनेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.
झरी तालुक्यातील मुकुटबन येथे उभारण्यात आलेल्या सिमेंट उत्पादन प्रकल्पामुळे वणी उपविभागात बऱ्यापैकी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भूमिपुत्रांना या सिमेंट उत्पादन प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. रिलायन्स समूहाची आर.सी.सी.पी.एल. ही सिमेंट उत्पादन कंपनी वणी उपविभागाच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी ठरली आहे. मुकुटबन येथे उभारण्यात आलेला भव्य सिमेंट उत्पादन प्रकल्प वणी उपविभागाच्या औद्योगिकीकरणाला बळकटी देणारा ठरला असून बेरोजगार युवकांसाठी एकप्रकारे वरदान ठरला आहे. औद्योगिक क्षेत्रात वणी उपविभागाचं प्राबल्य वाढविणाऱ्या या सिमेंट उत्पादन कंपनीमुळे वणी उपविभागाला औद्योगिक विकासाची एक नवी दिशा मिळाली आहे. आर.सी.सी.पी.एल. कंपनीत शेकडो बेरोजगार युवकांना रोजगार मिळाल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटला आहे. बेरोजगारी निर्मूलनाबरोबरच वणी उपविभागातील औद्योगिक विकासाची पायाभरणी करणारा हा सिमेंट प्रकल्प ठरला आहे.
आर.सी.सी.पी.एल. कंपनीत कार्यरत असलेल्या कामगारांच्या न्याय हक्कांचे जतन करण्याकरिता तथा त्यांना कंपनीच्या सर्व सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी या कंपनीमध्ये कामगार सेनेची स्थापना केली आहे. कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारलेल्या कामगारांच्या न्याय्य, हाकांसाठी मनसेची ही कामगार सेना कटिबद्ध राहणार असून कामगार सेनेच्या माध्यमातून त्यांना सुरक्षेचं कवचंही मिळणार आहे. कामगार सेनेचं सदस्यत्व स्वीकारलेल्या प्रत्येक कामगाराचा मनसे कडून ५ लाख रुपयांचा सुरक्षा विमा काढण्यात येणार आहे. कायद्यात बसणाऱ्या सर्व सोइ सुविधा येथील कामगारांना उपलब्ध करून देण्यास मनसे प्रयत्नशील राहणार असल्याचे राजू उंबरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांच्या अधिकारांचे हनन होणार नाही, याचीही खबरदारी कामगार सेना घेणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. या पक्ष प्रवेश सोहळ्याला मनसेचे झरी तालुकाध्यक्ष गजानन मिलमिले, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, संतोष चिटलावर, अभिषेक पिटलावार, लकी सोमकुंवर, वैभव पुराणकर यांच्यासह कामगार व पक्षाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments: