Latest News

Latest News
Loading...

शहरवासीयांना लाईव्ह पहायला मिळणार वर्चस्वाची लढाई, मनसे व भाजप दाखविणार विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण

प्रशांत चंदनखेडे वणी 

सांघिक खेळाच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी विश्वकप (२०२३) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाशी होणार आहे. विश्वकप स्पर्धेत आता पर्यंत अजिंक्य राहिलेला भारतीय संघ या स्पर्धेचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. भारतीय क्रिकेट संघ विश्वकप जिकंण्यापासून एक पाऊल दूर असून १९ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला नमवून तिसऱ्यांदा विश्वकप विजेता बनण्याच्या उंबरठयावर आहे. विश्वकप स्पर्धेतील लीग सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला सहज पराभूत केले  होते. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचेच पारडे जड राहणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. विश्वकप स्पर्धेतील अंतिम सामना हा हृदयाचे ठोके वाढविणारा ठरणार आहे. सध्याचा भारतीय संघ हा संतुलित असून सांघिक खेळाचे दर्शन घडवतो आहे. सकारात्मक खेळ करणाऱ्या भारतीय संघाचे मनोबल सध्या गगनाएवढे उंचावले आहे. त्यामुळे भारतीय संघ विश्वकप जिंकणारच असा आशावाद व्यक्त केला जात आहे. वर्चस्वाची ही लढाई शहरात लाईव्ह पहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. मनसेचे नेते राजू उंबरकर हे विश्वकप स्पर्धेचा अंतिम सामना भरचौकात शहरवासीयांना लाईव्ह दाखविणार आहेत. तर भाजप चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे व व्यापारी कुणाल चोरडिया यांनी देखील याच परिसरात अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे वर्चस्वासाठीची ही लढाई शहरावासीयांना थेट पहायला मिळणार आहे. 

विश्वकप स्पर्धेच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मनसे व भाजपने शहरवासीयांसाठी उपलब्ध करून दिली आहे. घरी छोट्या पडद्यावर एकांतात विश्वकप स्पर्धेचा हा ऐतिहासिक सामना न बघता शहरवासीयांना स्टेडियममध्ये सामना बघण्याचा फील यावा म्हणून दोन्ही पक्षांनी मोठ्या स्क्रीनवर सामना दाखविण्याची संकल्पना आखली आहे. फलंदाजांनी चौकार, षटकार मारला किंवा गोलंदाजाने बळी घेतला तर डीजेचा आवाज निनादणार आहे. सामन्यादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी देखील होणार आहे. मनसेने तरुणाईचा जोश वाढविणारे अनेक कार्यक्रम शहरात घेतले आहेत. शहरवासीयांचा आनंद द्विगुणित करण्याकरीता मनसेने सर्व आनंदाचे क्षण शहरवासीयांसोबत घालविले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदारही शहरवासीयांसोबतच व्हावे, ही राजू उंबरकर यांची मनीषा असून त्यांनी शहरवासीयांसाठी हा एक दिवसाचा आनंदाचा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यातून क्रिकेटचा आनंद लुटण्याची पर्वणी मिळणार असून एक आनंदाचा क्षण घालविण्याची संधी मिळणार आहे. विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या या महाअंतिम सामन्यात भारतमातेचा जयघोष होणार आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता चार भिंतीतून बाहेर पडून खुल्या आसमंतात सर्वांसोबत या अंतिम सामन्याचा आनंद लुटण्याची संधी खास वणीकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेंव्हा १९ नोव्हेंबर हा दिवस स्मरणात ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व जनतेने एकवटून विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आनंद लुटण्याचे आव्हान करण्यात आले आहे.  

विश्वकप २०२३ ही क्रिकेट जगतातली महास्पर्धा भारताच्या यजमान पदाखाली आयोजित करण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या सामन्यापासूनच आपली चमक दाखविली. सांघिक खेळाचं दर्शन घडवलं. चिव्वट खेळी करीत प्रतिस्पर्धी संघाला कडवी झुंज दिली. नवही लीग सामने सहज जिंकले. उपांत्य फेरीतही न्यूझीलंडला धूळ चारली. अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. न्यूझीलंड सोबत उपांत्य फेरीत पराभूत होण्याची शृंखला तोडली. या विश्वकप स्पर्धेत भारतीयांनी अनेक रेकॉर्ड तोडले, व नवा कीर्तिमान रचला. विराट कोहलीने महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा एकदिवसीय सामन्यातील ४९ शतकांचा विक्रम मोडला. कोहलीने एक दिवसीय सामन्यात ५० शतकं झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचाही सचिन तेंडुलकर यांचा विक्रम कोहलीने मोडीत काढला आहे. रोहित शर्माने या विश्वकप स्पर्धेत ६३ चेंडूत शतक झळकावलं आहे. त्याने विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक शतक असलेल्या सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५६ षटकार मारण्याचा नवा विक्रम केला आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळतांना त्याने १४ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. ही कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग नंतर तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे. विश्वकप स्पर्धेत केएल राहुल सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात ६२ चेंडूत वेगवान शतक ठोकलं आहे. मोहम्मद शमीने या स्पर्धेत २३ विकेट घेतल्या असून तो विश्वकपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या ५ गोलंदाजांमध्ये सहभागी झाला आहे. असे अनेक कीर्तिमान विश्वकप २०२३ या स्पर्धेत रचले गेले आहेत. अंतिम सामन्यातही काही रेकॉर्ड तुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.