Latest News

Latest News
Loading...

दोन वस्तू वाढविल्या आणि दोन वस्तूंच्या वजनात केली कपात, यावेळी आनंदाचा शिधा आला चर्चेत

प्रशांत चंदनखेडे वणी 

सणासुदीच्या काळात स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना देण्यात येणारा आनंदाचा शिधा दिवाळी सारख्या मोठ्या व महत्वाच्या सणालाच कपात करून देण्यात आल्याने लाभार्थ्यांमधून कमालीची नाराजी व्यक्त होतांना दिसत आहे. गोर गरीब जनतेबाबत अनास्था दाखवणाऱ्या सरकारने गोर गरिबांची मोठी थट्टा करणे सुरु केले आहे. आनंदाचा शिधा म्हणून लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून सणासुदीला चार वस्तूंची एक किट देण्याचा शासनाने उपक्रम सुरु केला आहे. नाममात्र दर (१००) आकारून लाभार्थ्यांना चार वस्तूंची ही किट दिली जाते. १०० रुपयात प्रत्येकी एक किलो अशा चार वस्तूंची किट आनंदाचा शिधा म्हणून शासनाकडून लाभार्थ्यांना दिली जात होती. पण दिवाळी सारख्या मोठ्या सणालाच या किट मधील वस्तू अर्धा किलोने कमी करून शासनाने लाभार्थ्यांची एकप्रकारे थट्टा केली आहे. महागाईच्या या काळात सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले असतांना शासन आनंदाच्या शिध्यातही कपात करून त्यांच्या सण साजरे करण्यावरही मर्यादा आणतांना दिसत आहे. सणासुदीला सर्वसामान्यांनाही गोडधोड करून खाता यावे म्हणून शासनाने रेशन दुकानातून त्यांना आनंदाचा शिधा देण्याचा उपक्रम सुरु केला. हा आनंदाचा शिधा देतांना शासनाकडून मोठा गाजावाजाही करण्यात आला. पण दिवाळी सारख्या महत्वाच्या सणालाच आनंदाचा शिधा कपात करून देण्यात आल्याने सर्वसामान्यांची घोर निराशा झाली असून जनतेतून खेदजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शासनाच्या या दुटप्पी धोरणाची सर्वसामान्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे. 

सणासुदीच्या काळात शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून आनंदाचा शिधा देण्यात येतो. या शिधा किटमध्ये प्रामुख्याने चार वस्तूंचा समावेश असतो. पण सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाने शिधा किटमध्ये ६ वस्तू देण्याचा निर्णय घेतला. एक किलोच्या सहा वस्तूंची शिधा किट न देता शासनाने त्यात कपात करून अर्धा किलोच्या चार वस्तूंचा समावेश केला. त्यामुळे शासनाची सर्वसामान्यांप्रती असणारी अनास्था या निमित्ताने दिसून आली. दिवाळीचा हा सण आनंदात साजरा करता यावा म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना बोनस दिल्या जातं. पण सर्वसामांना दोन वस्तू बोनस म्हणून शासन देऊ शकलं नाही. उलट नियमित शिधा किट मधील एक किलोच्या दोन वस्तू अर्धा किलो करून त्यात अर्धा किलोच्या दोन वस्तूंची भर घालण्यात आली. यावरून शासनाला गोरगरिबांचा किती कळवळा आहे, याचा प्रत्यय येतो. एक किलोच्या दोन वस्तू अतिरिक्त देणे शासनाला शक्य झाले नाही. शिधा किट मधीलच दोन वस्तू अर्धा किलोने कमी करून दोन वस्तू वाढविण्यात आल्या, व वाहवाही लुटण्यात आली. सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाकडून रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्यात आला. पण या शिधा किट मधील वस्तूंचे खाद्यपदार्थ तयार केल्यानंतर कुणाच्या वाट्याला किती घास येतील हा पेच सर्वसामान्यांपुढे निर्माण झाला. कुटुंबीयांबरोबर दिवाळी साजरी करण्याच्या त्यांच्या आनंदावर विरजण आणण्याचं काम शासनाने केलं. मूठभर देऊन आभाळाएवढी प्रसिद्धी मिळविणाऱ्या शासनाचं दुटप्पी धोरण जनतेला चांगलंच कळून चुकलं असून शासनाकडून दिवाळीच्या पर्वावर देण्यात आलेला आनंदाचा शिधा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला. 

No comments:

Powered by Blogger.