प्रशांत चंदनखेडे वणी
सिंधी कॉलनी परिसरातील क्वालिटी रेस्टोरंटमध्ये शुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन दोघांनी एकाला जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. क्वालिटी रेस्टोरंटमध्ये जेवणाकरिता आलेल्या दोघांचा त्याठिकाणी बसून असलेल्या एका व्यक्तीशी वाद झाला. वाद वाढतच गेल्याने त्यांच्यात धुमश्चक्री उडाली. दोघांनी मिळून एकाला जबर मारहाण केली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींनी पोलिस कार्यवाहीतही अडथळे निर्माण केल्याने त्यांच्यावर शासकीय कामात व्यत्यय आणल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधी कॉलनी येथील रहिवासी असलेले सुदामा हरिदासमल साधवानी (६०) हे क्वालिटी रेस्टोरंटमध्ये बसून असतांना या रेस्टोरंटमध्ये जेवणाकरिता आलेल्या सुधिर पेटकर व करण चुनारकर यांचा त्यांच्याही शुल्लक कारणावरून वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की त्या दोघांनीही सुदामा साधवानी यांना बेदम मारहाण केली. त्यांचा घरापर्यंत पाठलाग करीत त्यांना घरून ओढून देखील मारहाण करण्यात आली. साधवानी यांना मारहाण होत असतांना मध्यस्थी करण्याकरिता गेलेल्या त्यांच्या नातेवाईकांनाही त्या दोघांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुधीर पेटकर व सुदामा साधवानी हे एकमेकांशी परिचित असतांना त्यांच्यात अचानक कसा काय वाद उफाळून आला, याचेच आश्चर्य वाटते. त्यांच्यात कशी काय वादाची ठिणगी पडली व प्रकरण मारहाणीपर्यंत पोहचले, हा चर्चेचा विषय बनला आहे. सुदामा साधवानी यांनी झालेल्या मारहाणीनंतर पोलिस गाठले, व सुधीर पेटकर व करण चुनारकर यांच्या विरुद्ध मारहाणीची तक्रार नोंदविली. दरम्यान सिंधी कॉलनी येथील रहिवाशीही मोठ्या संख्येने पोलिस स्टेशनला आले, व त्यांनी आरोपींवर गुन्हे दाखल करण्याकरिता पोलिस स्टेशन परिसरातच ठिय्या मांडला. पोलिसांनी दोनही आरोपींवर गुन्हे दाखल करून पोलिस त्यांना अटक करण्याची कार्यवाही करीत असतांना आरोपींनी पोलिस कार्यवाहीत अडथळे निर्माण केले. त्यामुळे शासकीय कामात व्यत्यय आणल्याप्रकरणीही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी आरोपी सुधिर पेटकर व करण चुनारकर यांच्यावर भादंवि च्या कलम ३९४, ४५२, २९४, ५०४, ५०६, ३४ तथा शासकीय कामात अडथळे निर्माण केल्या प्रकरणी भादंवि च्या कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
No comments: