शहरातील अवैध फटका दुकाने व गोदामावर महसूल विभागाची धडक कार्यवाही, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी केली होती तक्रार
प्रशांत चंदनखेडे वणी
दिवाळीच्या पर्वावर प्रशासनाकडून फटका व्यापाऱ्यांना फटका विक्री परवान्यांचे नूतनीकरण करून दिले जाते. फटाक्याची दुकाने लावण्याकरिता फटका विक्रीचा परवाना असणे आवश्यक असते. दिवाळी निमित्त फटाक्यांची दुकाने लावण्याकरिता व्यापाऱ्यांना नगर पालिकेकडून भाडे तत्वावर जागा देखिल उपलब्ध करून दिली जाते. परंतु शहरात काही ठिकाणी अवैधरित्या फटाक्यांची दुकाने लावली लावली जातात. वर्दळीच्या ठिकाणी व दाट वस्तीत फटाक्यांची दुकाने लावून धोकादायक परिस्थिती निर्माण केली जाते. अशा या अनाधिकृत फटका दुकानांवर महसूल विभागाने कार्यवाहीचा बडगा उगारून दुकाने सील केल्याने अवैध फटका विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. नायब तहसीलदार रविंद्र कापशीकर यांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेल्या पथकाने शहरातील फटका दुकानांचे निरीक्षण करून अवैध फटका दुकानांवर धडक कार्यवाही करीत फटाक्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. तसेच अवैध फटाक्यांची दुकाने व गोदामही महसूल विभागाने सील केले आहे. फटाक्यांचे होलसेल विक्रेता पालकर यांचे वसंतगंगा विहार येथील अनाधिकृत फटाक्यांचे गोदाम सील करण्यात आले आहे. रहिवाशी वस्तीत अनाधिकृतपणे फटाक्यांचा साठा करून व दुकान लावून ते फटाक्यांची विक्री करायचे. त्यांच्या नियमबाह्य पद्धतीने फटाक्याचे दुकान लावण्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुषंगाने महसूल विभागाने शहरात निरीक्षण करून पालकर यांच्या गोदामासह गांधी चौकातील कुल्दीवार व सर्वोदय चौकातील नागपुरे यांची फटका विक्रीची दुकाने देखिल सील केली. शहरातील लोकवस्त्यांमध्ये व निवासस्थानांमध्ये फटाक्यांची दुकाने लावून सर्रास फटाक्यांची विक्री केली जाते. मागील वर्षी पर्यंत जी.प. बांधकाम विभागाच्या बाजूलाच मोठे फटाक्यांचे दुकान लागायचे. पण महसूल विभाग मात्र आंधळेपणाचे सोंग घ्यायचा. यावर्षी तक्रारी झाल्याने महसूल विभागाला जाग आली, पण दिवाळी झाल्यानंतर. महसूल विभागाने अवैध फटका दुकानांवर धाड सत्र अवलंबलेच आहे, तर त्यांनी शहरात आणखी निरीक्षण करण्याची अपेक्षा शहरवासियांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
No comments: