प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील एका अट्टल गुन्हेगाराला उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने हद्दपार करण्यात आले आहे. या गुन्हेगाराच्या शिरावर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. अतिशय कमी वयात त्याने गुन्हेगारीचे धडे घेऊन तो अट्टल गुन्हेगार बनला. त्याच्या गुन्ह्यांचा वाढता आलेख बघता त्याला तडीपार करण्यात आले आहे. साहिल कैलाश पुरी (२०) रा. सेवानगर असे या तडीपारीचे आदेश निघालेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला यवतमाळ जिल्ह्यासह आसपासच्या तालुक्यातही सहा महिन्यांपर्यंत वावरता येणार नाही. पोलिसांनी त्याला उमरेड पोलिस स्टेशन हद्दीत त्याच्या नातेवाईकाकडे सोडले आहे.
साहिल पुरी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्या शिरावर चोरी, जबरी चोरी व जीवे मारण्याचा प्रयत्न यासह अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या वर्तनात कुठलाही सुधार होत नसल्याचे पाहून उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने त्याला सहा महिन्यांकरिता तडीपार करण्यात आले आहे. त्याला सहा महिन्यांपर्यंत जिल्हाबंदी राहणार असून वरोरा, भद्रावती व कोरपना या आसपासच्या तालुक्यातही त्याला ताडीपारीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत वावरता येणार नाही. अतिशय कमी वयात अट्टल गुन्हेगार बनलेल्या साहिल पुरी याची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतच गेल्याने त्याला शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हद्दपार करण्यात आले आहे. यानंतरही गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या व वर्तनात सुधार होत नसलेल्या गुन्हेगारांचे तडीपारीचे आदेश निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर, पोउपनि धीरज गुल्हाने व पोलिस पथकाने केली.
No comments: