प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील राजूर (कॉ.) येथील राष्ट्रीय विद्यालयात एकेकाळी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तब्बल ३१ वर्षानंतर शाळेत एकत्र येऊन भन्नाट स्नेहमिलन सोहळा साजरा केला. १९९३-९४ च्या बॅचचे विद्यार्थी असलेल्या व आता विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या या वर्ग मित्रांनी आपल्या व्यस्त जीवनातून थोडी उसंत काढून विद्यार्थी दशेतील त्या आठवणींना उजाळा दिला. शालेय जीवनातील तो निरागसपणा परत एकदा या वर्ग मित्रांनी अनुभवाला. हे सर्व वर्ग मित्र परत शाळेच्या वातावरणात रमले. विद्यार्थी जीवनातील त्या आठवणी त्यांनी एकमेकांशी शेअर केल्या. शालेय जीवनातील आठवणीत ते लिन झाले. एवढ्या वर्षानंतर शाळेत एकत्र येण्याचा योग जुळून आल्याने तो आनंद या वर्ग मित्रांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. भन्नाट हास्य विनोद व गप्पा गोष्टींमध्ये रममाण झालेल्या या वर्ग मित्रांनी मनमोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधले. परत एकदा विद्यार्थी होऊन ते शालेय जीवनातील त्या आठवणीत रमले. शाळेत शिक्षण घेतांना अलगद निघून गेलेलं बालपण स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने का होईना या वर्ग मित्रांनी परत एकदा भरभरून जगलं.
हुरहुन्नरी व गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या राजूर येथील राष्ट्रीय विद्यालयात सन १९९३-९४ साली १० वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तब्बल ३१ वर्षानंतर शाळेत एकत्र येत स्नेहमिलन सोहळा साजरा केला. तत्कालीन विद्यार्थ्यांच्या या स्नेहमिलन सोहळ्याला शिक्षकांनीही आवर्जून उपस्थिती दर्शविली. त्यावेळी विद्यार्थी असलेले हे सर्व वर्ग मित्र आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यस्त जीवनातून वेळ काढून हे सर्व वर्ग मित्र एकत्र आले. शाळेत एकत्र आलेले हे वर्ग मित्र परत एकदा विद्यार्थी बनले. त्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाचीही सांगड मिळाली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खाडे, चौधरी, गारघाटे व धानोरकर या शिक्षकांनी आपले विचार व्यक्त करतांना जीवनातील धूसर झालेल्या त्या आठवणी जिवंत केल्या. जीवनातील कटू गोड अनुभव सांगत त्यांनी वर्ग मित्रांना प्रेरणा मिळेल असे विचार मांडले. तसेच भविष्यातही वर्ग मित्रांनी अशा प्रकारे एकत्र येऊन आनंद साजरा करावा, अशीही या शिक्षकांनी अपेक्षा व्यक्त केली.
हा स्नेहमिलन सोहळा शंकर पाझारे, मोसेज कोमलवार, संगिता भगत, अनिल जुमनाके, रवि कंदकुवार, अर्चना कडुकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला. या स्नेहमिलन सोहळ्याच्या यशस्वीतेकरिताही या वर्ग मित्रांनी विशेष सहकार्य केले. तत्कालीन दहावीच्या बॅचचे बहुतांश विद्यार्थी या स्नेहमिलन सोहळ्यात सहभागी झाले होते. जुन्या नवीन आठवणी एकमेकांशी वाटून आनंदाच्या वातावरणात वर्ग मित्रांनी हा स्नेहमिलन सोहळा साजरा केला.
No comments: