प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बंद घर आणि घरफोडी हे आता समीकरणच बनलं आहे. बंद घर चोरट्यांना चोरीची पर्वणी देण्यासारखं झालं आहे. बंद घरांना टार्गेट करून चोरटे घरातील मुद्देमालावर हातसाफ करू लागले आहेत. मोटारसायकल चोरीच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांकडे आता पोलिसही दुर्लक्ष करू लागले की काय, असे वाटू लागले आहे. चोरट्यांचा शोध घेण्याची पोलिसांची दृष्टी कमकुवत झाली असल्याच्या चर्चा आता शहरात रंगू लागल्या आहेत. शहर चोरट्यांसाठी खुलं रान बनलं असून चोरटे पोलिसांना खुलं आव्हान देत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. एकाच रात्री घर व दुकान फोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीच्या वस्तू व रोख रक्कम आणि दुकानातील वस्तू व साहित्य लंपास केले. या दोनही चोरीच्या घटना १ जुलैला सकाळी उघडकीस आल्या.
शहरातील जैन ले-आऊट येथे वास्तव्यास असलेल्या गुरुनाथ सखाराम पिदूरकर (६८) यांच्या घरी सुरेंद्र मुडय्या कल्लुरी (२९) हे वेकोलि कर्मचारी किरायाने राहतात. ३० जूनला घरमालक व भाडेकरू हे दोघेही घराबाहेर गेल्याने त्यांच्या घराला कुलूप लागले होते. ही संधी साधून चोरट्यांनी दोघांच्याही घरी हातसाफ केला. घराचा कुलूपकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आणि घरातील कपाट फोडून कपाटातील सोन्याचांदीच्या वस्तू व रोख रक्कम लंपास केली. भाडेकरू सुरेंद्र कल्लुरी यांच्या घरातील कपाटातून चोरट्यांनी १७.८ ग्राम वजनाची सोन्याची पोत किंमत १ लाख ३५ हजार रुपये आणि ६५ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तर घरमालक (जे स्वतः सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी आहेत) गुरुनाथ पिदूरकर त्यांच्या घरातील कपाटातून चोरट्यांनी २० ग्राम वजनाची चांदीची अत्तरदानी किंमत १० हजार रुपये, २५ ग्राम वजनाची चांदीची वाटी किंमत १२ हजार ५०० रुपये, ७ ग्राम वजनाचा चांदीचा चमच किंमत ३ हजार ५०० रुपये आणि रोख ७ हजार रुपये असा एकूण ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
कुलूपबंद असलेल्या एकाच घरी घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल २ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सकाळी ६ वाजता ही घरफोडीची घटना उघडकीस आली. त्यानंतर घरमालक गुरुनाथ पिदूरकर यांनी घरी चोरी झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आता या चोरी प्रकरणाचा तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. कारण यापूर्वी झालेल्या घरफोडीच्या घटनांचा तपास अद्यापही सुरूच आहे. चोरटे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे चोरी प्रकरणांचा छडा लावण्यात होत असलेली दिरंगाई आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटना, यामुळे शहरवासी कमालीचे काळजीत आले आहेत.
एमआयडीसी परिसरातील दुकान फोडले
शहरातील एमआयडीसी परिसरातील गजानन फर्निचर हे दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील वस्तू व साहित्य लंपास केले. ३० जूनला रात्री ८ वाजता अनिकेत गजानन गहुकर (२५) यांनी नेहमी प्रमाणे दुकान बंद केले. त्यानंतर १ जुलैला सकाळी ९ वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे आढळून आले. रात्री ८ वाजता नंतर चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील वेल्डिंग मशीन किंमत ८ हजार रुपये, ग्राइंडर किंमत ६ हजार रुपये, स्क्रू मशीन किंमत ४ हजार रुपये आणि इलेक्ट्रिक बोर्ड किंमत ५०० रुपये असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत अनिकेत गहुकर यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलिस करीत आहे.
No comments: