सूर्यकुलातील परंपरेने माणूस घडविला... प्रा. डॉ. सिद्धार्थ बुटले, वणी येथे नुकताच पार पडला ग्रंथ प्रकाशन सोहळा
प्रशांत चंदनखेडे वणी
भारतात आर्य परंपरा व सूर्यकुलातील परंपरा आहे. आर्य परंपरेने माणसाला विकृत केले. त्यांच्या डोक्यात काल्पनिक देवांचं भूत घालून लोकांना धार्मिक दंगलीत अडकवून ठेवले. मात्र सूर्यकुलातील परंपरेने माणूस घडविला, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. सिद्धार्थ बुटले यांनी केले. सूर्यकुलातील वैचारिकता या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. वणी येथे नुकताच सूर्यकुलातील वैचारिकता या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ पार पडला. प्रा. सुमन देशपांडे यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. सिद्धार्थ बुटले हे पुढे बोलतांना म्हणाले की, प्रा. विजय वाघमारे यांनी आंबेडकरी विचारांचे सूत्र पकडून सूर्यकुलातील वैचारिकता या ग्रंथाच्या लेखांचे लेखन केले. हे सर्व लेख चिंतनशील असून हा ग्रंथ अभ्यासकांनी व संशोधकांनी नक्कीच वाचण्यासारखा आहे.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्योतीक ढाले यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रा विजय वाघमारे यांनी लिहिलेला हा ग्रंथ भारतातील दोन परंपरांची अनुभूती देणारा असल्याचे म्हटले. यावेळी माधुरी विजय वाघमारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. सुमन वाघमारे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करतांना म्हटले की, प्रा. विजय वाघमारे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण वाचनातून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. आणि ते सर्वच लेख सूर्यकुलातील आहेत.
सूर्यकुलातील वैचारिकता या ग्रंथावर भाष्य करतांना प्रा. पुरुषोत्तम पाटील म्हणाले की, भारतीय समाज व्यवस्थेला एकसंघ ठेवण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीअंताचा लढा दिला. हा लढा आजही तेवढ्याच प्रकर्षाने देण्याची गरज असल्याचे प्रा. विजय वाघमारे यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांचे विविध विषयांवरील लेख त्यांच्या समाज चिंतनातून साकार झाले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. कुलदीप शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन राजेश वाघमारे यांनी केले. या ग्रंथ प्रकाशन समारंभाला माजी प्राचार्य अनिल हूड, संदीप वाघमारे, वर्षा ढाले, अनघा वाघमारे, प्रियंका वाघमारे आणि आप्तेष्ट व श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
No comments: