कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला मनसे नेते राजू उंबरकर यांची भेट, कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली
प्रशांत चंदनखेडे वणी
राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी मागिल बारा दिवसांपासून समायोजनाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. शहरातील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या बाजूला या कर्मचाऱ्यांचे हे कामबंद आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला काल मनसे नेते राजु उंबरकर यांनी पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन यापुढे आता तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी मनसेची असेल अशी आंदोलनकर्त्यांना ग्वाही दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीमध्ये सर्व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. आरोग्य दूत बनून ते खऱ्या अर्थाने आरोग्य सेवेचे कर्तव्य बजावत आहेत. प्रामाणिकपणे अत्यंत तुटपुंज्या वेतनात कोणत्याही अतिरिक्त सोयी सुविधा शासनाकडून मंजूर नसतांनाही हे कर्मचारी पंधरा वर्षापासून आरोग्य सेवा देत आहेत. उमेदीच्या काळात रोजगारांच्या संधी उपलब्ध असताना देखील हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कर्तव्य बजावत आहेत. दरम्यानच्या काळात राज्यात माता मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी झाले, बालकांचे लसीकरण व महिलांच्या प्रसुती आरोग्य सेवेतच होत आहेत. कुपोषणाचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. तसेच कोविड काळातही प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मात्र शासनाकडून नेहमीच उपेक्षित राहावे लागले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करून घ्यावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. गेल्या २५ सप्टेंबर पासून राज्यातील ४० हजार कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन पुकारल्याने आरोग्य सेवेची धुरा ४० टक्के लोकांवर आहे. याचा मोठा परिणाम आरोग्य सेवेवर दिसून येत आहे.
या कर्मचाऱ्यांची मागणी राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचावी याकरिता या आंदोलकांनी मनसे नेते राजू उंबरकर यांना आंदोलन स्थळी पाचारण करून त्यांनी आपल्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या पर्यंत ही मागणी पोहोचवावी असा हा आग्रह धरला. कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून काल (दिनांक ०५ नोव्हेंबर) या काम बंद आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी भेट देऊन या कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या, व त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला. महाराष्ट्रामध्ये आजवर अशा अनेक मुद्द्यांना मनसेने न्याय मिळवून दिला आहे. मुंबईतील शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अशा अनेक मुद्द्यांवर तोडगा निघालेला आहे. त्यामुळे आपलाही मुद्दा मनसेच्या माध्यमातून निकाली निघेल असा विश्वास राजू उंबरकर यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी आम्ही तुमच्या एका शिष्टमंडळाला सोबत घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटू आणि त्यांच्या माध्यमातून सरकारवर समायोजन करण्याकरिता दबाव आणू असा विश्वासही त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिला. आपली मागणी नक्कीच मान्य होईल व आपल्या या आंदोलनाचे फलित होईल, असं मत राजू उंबरकर यांनी यावेळी व्यक्त केलं. तर आंदोलनकर्त्यांनी राजू उंबरकर यांच्या वक्तव्याला समर्थन देत राज ठाकरे यांची भेट घडवून द्यावी, अशी मागणी केली. तेंव्हा दिवाळीनंतर जिल्ह्यातील एक शिष्ट मंडळ राजू उंबरकर यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांची भेट घेणार आहे, व आपल्या मागण्यांवर त्यांच्याशी चर्चा करणार आहे. जोवर आपल्या या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व ताकदीनिशी आपल्या सोबत असेल असा विश्वासही यावेळी उंबरकर यांनी आंदोलनकर्त्याना दिला. यावेळी आंदोलनकर्ते संतोष राठोड, मंगेश वडेवार, सुधीर उजविने शब्बीर शेख, डॉ. प्रमोद बनसोड, पंकज गुल्हाने, राजेंद्र वाघमारे, संतोष चव्हाण यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, गजानन पोटे, अभिजीत नानवटकर, वैभव पुराणकर यांच्यासह सर्व मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
No comments: