प्रशांत चंदनखेडे वणी
रानडुकराच्या हल्ल्यात शेत मजूर महिला जखमी झाल्याची घटना ८ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता मोहर्ली शेतशिवारात घडली. रसिकाबाई बंडूजी गेडाम (५५) रा. मोहर्ली असे या जखमी महिलेचे नाव आहे.
सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरु असल्याने शेतकरी व शेत मजूर शेतात राबताना दिसत आहे. शेत शिवारालगत वन्य प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर असून ते शेतकरी व शेतमजुरांवर करू लागल्याने त्यांच्यात कमालीची धास्ती निर्माण झाली आहे. शेतात रानडुकरांनी हौदोस घातला आहे. ते शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करू लागले आहे. शेतकरी व शेत मजुरांवर हल्ले चढवून त्यांना जखमी करू लागले आहेत. शेत शिवारात रानडुकरांचा वावर वाढल्याने कास्तकार भीतीच्या सावटात आले आहेत. शेतकरी व शेत मजुरांना रानटी जनावरांपासून नेहमी सावध रहावं लागतं. पण तरीही शेत कामात व्यस्त असतांना हे रानटी जनावरं अलगद त्यांच्यावर हल्ला चढवितात. वणी तालुक्यातील मोहर्ली शेत शिवारात कापूस वेचणी करीत असलेल्या शेत मजूर महिलेवर अचानक रानडुकराने हल्ला चढविला. रानडुकराने जोराची धडक देताच महिला जमिनीवर कोसळली. महिलेवर रानडुकराने हल्ला चढविताच सोबत काम करीत असलेले शेत मजुर धावून आले, व त्यांनी रानडुकराला हुसकावून लावले. त्यामुळे अघटित घटना टळली. रानडुकराच्या हल्ल्यात रसिकाबाई गेडाम ही महिला जखमी झाली असून तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
शेत शिवारात रानडुकरांचा हौदोस वाढला असून रानडुकरं शेतपिकांचं मोठं नुकसान करू लागले आहेत. रानडुकरांचे कळप शेत शिवारात मुक्त संचार करीत असल्याने शेतकरी व शेत मजूर भीतीच्या सावटात आले आहेत. शेतपिकांचं नुकसान व शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले होत असतांनाही वन विभाग मात्र रानडुकरांचा बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरताना दिसत आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या अनेक तक्रारी होऊनही वन विभाग कुठल्याही उपाययोजना करण्याची तसदी घ्यायला तयार नाही. वन विभागाच्या सुस्त कामामुळे कास्तकारांचा जीव धोक्यात आला असून रानडुकरांचा बंदोबस्त करण्यास वन विभाग अपयशी ठरल्याने कास्तकारांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे.
No comments: