प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील टिळक चौक या वर्दळीच्या ठिकाणी धारदार शस्त्रांसह धुमाकूळ घालून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना डीबी पथकाने अटक केली आहे. वन विभागाच्या कार्यालयाजवळ दुचाकीवर स्वार असलेले हे युवक हातात धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालत असतांना शहरात गस्त घालणाऱ्या डीबी पथकाने त्यांना अटक केली. ही कार्यवाही आज ६ नोव्हेंबरला दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. शैलेंद्र उर्फ शंकर साईनाथ बावणे (२५) रा. चिंचोली रा. राजुरा जि. चंद्रपूर व बादल राजेश दुपारे (२५) रा. वणी अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दिवाळी निमित्त खरेदी करण्याकरिता शहरात नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे. ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ फुलून निघाली आहे. शहरातील रस्तेही नागरिकांनी गजबजले आहेत. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य वर्दळीचा चौक असलेल्या टिळक चौक येथील वनविभागाच्या कार्यालयाजवळ दोन दुचाकीस्वार तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालीत असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. डीबी पथकाने तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना पाहून या टपोरी तरुणांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तावडीतुनही निसटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण पण डीबी पथकाने सौम्य बळाचा वापर करून त्यांना जखडले. भर चौकात हुडदंग घालणाऱ्या दोनही आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांच्यात शिरलेलं भाईगिरीचं भूत उतरविलं. वर्दळीच्या चौकात तलवार व सत्तूर हातात घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या दोनही आरोपींना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडविली. बेकायदेशीरपणे धारदार शस्त्र जवळ बाळगून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या दोनही आरोपींवर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींजवळून पोलिसांनी ८१ सेमी लांबीची तलवार, ३१ सेमी लांबीचा सत्तूर व एक मोटारसायकल असा एकूण ३० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख सपोनि माधव शिंदे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, वासिम शेख, गजानन कुडमेथे यांनी केली.
No comments: