Latest News

Latest News
Loading...

न्यू माजरी कोळसाखाणीत भूस्खलन, मातीचा मोठा ढिगारा पत्त्याप्रमाणे कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलिच्या न्यू माजरी कोळसाखान परिसरात १२ नोव्हेंबरला पहाटे भूस्खलन झाल्याची घटना घडली. कोळसाखाणीतील मातीचा मोठा ढिगारा पत्त्याप्रमाणे कोसळला. या कोळसाखाणीत शेकडो कर्मचारी काम करतात. पहाटेच्या सुमाराला थोडा अवकाश असल्याने कोणताही कर्मचारी तेथे कर्तव्यावर नव्हता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण ओबी वाहतूक करणारे ट्रक व लोडर मशीन मात्र वाऱ्याच्या वेगाने खाली कोसळल्या. भूस्खलन होऊ लागल्याने ट्रक चालक व मशीन ऑपरेटर जीव वाचविण्याकरिता सैरावैरा पळाले. या धावपळीत काही ट्रक चालक किरकोळ जखमी झाले आहेत. अंदाजे १२ व्हाल्वो ट्रक व मातीची लेव्हल करणाऱ्या ५ मशीन खाली कोसळल्याचे सांगितले जात आहे. भूगर्भातुन कोळसा बाहेर काढण्याकरिता महाकाय मशीनने कोळसाखाणीत उत्खनन करून मुरूम मातीचे नियमबाह्य पद्धतीने ढिगारे केले जात आहे. वेकोलिच्या कोळसाखाणीत पहाडाप्रमाणे मातीचे ढिगारे तयार झाल्याचे पहायला मिळतात. उत्खननातून निघणारी माती एकाच ठिकाणी खाली केली जात असल्याने कोळसाखाणीत मातीचे मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत. नियमांना धाब्यावर बसवून मातीचे ढिगारे केले जात असल्याने कोळसाखाणीत नेहमीच भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला असतो. कोळसाखाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून कर्तव्य बजावं लागत आहे. पहाटेच्या अवकाशाचा वेळ नसता तर मातीच्या ढिगाऱ्याखाली कित्येक जीव गडप झाले असते. मातीच्या या ढिगाऱ्यांमुळे कोळसाखाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे.

वेकोलिच्या न्यू मांजरी कोळसाखाणीत कोळशाचं उत्पादन वाढविण्याकरिता उत्खनन सुरु आहे. वेकोलीशी अधिनस्त असलेल्या के.जी.एस. या ओबी कंपनीला कोळसाखाणीच्या उत्खननाचं कंत्राट देण्यात आलं आहे. या ओबी कंपनीने डम्पिंग यार्डमध्ये नियमबाह्य पद्धतीने मातीचे ढिगारे केले आहेत. कोळसाखाणीच्या उत्खनातून निघालेली माती एकाच ठिकाणी खाली केली जात असल्याने कोळसाखाणीत मातीचे ढिगारे तयार झाले आहेत. याकडे वेकोलिचे अधिकारीही डोळेझाक करीत आहे. वेकोलि व ओबी कंपनी कोळसाखाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळतांना दिसत आहे. वेकोलिच्या हम करे सो कायदा या धोरणामुळे मानवी हानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ओबी कंपन्यांना वेकोलीचं पाठबळ मिळत असल्याने या कंपन्या देखील नियमांची ऐशी तैशी करतांना दिसत आहे. या ओबी कंपन्यांवर कुणाचही नियंत्रण राहिलेलं नाही. सर्वांचीच तोंडं बंद केली जात असल्याने कुणीही आवाज उठवायला पुढे येत नसल्याचे पहायला मिळत आहे. न्यू मांजरी कोळसाखाणीत भूस्खलन होऊन मातीचा मोठा ढिगारा पत्त्याप्रमाणे कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी धोका मात्र कायम आहे. ओबी वाहतूक करणारे ट्रक व मशीन पान गळती लागल्यागत ढिगाऱ्यावरून खाली कोसळले. त्यामुळे ट्रक चालक किरकोळ जखमी झाले आहेत. या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे कधी मोठी दुर्घटना होईल, हे सांगता येनं कठीण झालं आहे.. तेंव्हा शासन प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे. 

No comments:

Powered by Blogger.