प्रशांत चंदनखेडे वणी
श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र वणी द्वारा सांस्कृतिक संगीत आणि नाट्य महोत्सव-२०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नाट्य व संगीताने नटलेला हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ३० मार्चला सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत स्थानिक शेतकरी लॉन (वसंत जिनिंग) येथे हा महोत्सव रंगणार आहे. "शेगांवीचा संत गजानन" हे महानाट्य या महोत्सवाचे खास आकर्षण राहणार आहे.
वणी शहरात प्रथमच नाट्य व संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नाट्य, संगीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी वणीकरांसाठी या महोत्सवात राहणार आहे. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा हा सांस्कृतिक महोत्सव वणीच्या सांस्कृतिक इतिहासाला उजाळा देणारा ठरणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात शहराच्या संस्कृतीला साजेशे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे सुमधुर गायन, श्री जगन्नाथ महाराजांचे संगीतमय जीवन चरित्र, प्रा. हेमंत चौधरी व पुरुषोत्तम गावंडे यांचं हास्याचे फुलोरे उडविणारं हास्यदर्पण, आणि विशेष पर्वणी म्हणून स्वर मंथन बहुउद्देशीय संस्था नागपूर येथील ७० कलाकारांच्या अथक प्रयत्नातून व उत्कृष्ठ अभिनयातून साकार झालेलं "शेगांवीचा संत गजानन" हे महानाट्य खास वणीकरांसाठी आयोजित करण्यात आलं आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला हा महोत्सव याच देही याच डोळा बघण्याचा योग आयोजकांनी जुळवून आणला आहे. तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमांचं भरगच्च आयोजन असलेल्या या महोत्सवाला श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र वणी तथा शहरातील सामाजिक व धार्मिक संस्था अथक परिश्रम घेत आहेत.
No comments: