अनोळखी इसमावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपीला याआधीही झाली होती खुनाच्या गुन्ह्यात अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
अज्ञात कारणावरून एका अनोळखी इसमाला हत्यार सदृश्य वस्तूने मारून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत दादाराव कुमरे रा. सिंधी ता. मारेगाव असे या आरोपीचे नाव आहे. शहरातील बाकडे पेट्रोलपंप जवळील डॉ. झाडे यांच्या दवाखान्यासमोर एक इसम गंभीर जखमी अवस्थेत पडून होता. या इसमाला शस्त्र सदृश्य वस्तूने मारून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीला आज न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
बाकडे पेट्रोलपंप जवळील डॉ. झाडे यांच्या दवाखान्यासमोर २६ मार्चला सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास एक अनोळखी इसम रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. तेथे एक अनोळखी इसम विवस्त्र व गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याची शुद्धही हरपली होती. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी शस्त्र सदृश्य वस्तू मारण्यात आल्याने गंभीर जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी जखमी अवस्थेत पडून असलेल्या इसमाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला आधी चंद्रपूर येथे तर नंतर नागपूर येथे हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे.
अनोळखी इसमाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवून व सीसीटीव्ही फुटेज तपासून इसमाला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासांतच हुडकून काढले. या अट्टल गुन्हेगाराने याआधीही एका अनोळखी इसमाचा खून केला होता. आताही त्याने अज्ञात कारणावरून एका अनोळखी इसमावर जीवघेणा हल्ला केल्याने त्याची क्रूरता समोर आली आहे. पोलिसांनी अनोळखी इसमावर शस्त्र सदृश्य वस्तूने हल्ला चढविणाऱ्या अनिकेत कुमरे या आरोपीवर बीएनएसच्या कलम ११८(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. घटनेचा पुढील तपास एपीआय अश्विनी रायबोले करीत आहे.
No comments: