प्रशांत चंदनखेडे वणी
शेजाऱ्यांचं एकमेकांशी पटत नसलं की शुल्लक कारणांवरूनही वाद उपस्थित होतात. शेजारी एकमेकांचे कट्टर विरोधी असले की ते एक दुसऱ्याशी वाद घालण्याचे कारण शोधत असतात. कुठल्या ना कुठल्या कारणावरून नेहमी खटके उडणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये खरकटे पाणी गेट समोर टाकण्यावरून वाद उपस्थित झाला. वाद एवढा विकोपाला गेला की दोन महिला आपसात भिडल्या. एकमेकांचे केस पकडून त्या अक्षरशः एकमेकांवर तुटून पडल्या. शेजारी राहणाऱ्या या दोन महिलांमध्ये चांगलीच फ्रीस्टाईल झाली. एका महिलेने दुसऱ्या महिलेचे केस आवळून तिला खाली पाडले. तिला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. एवढेच नाही तर महिलेचा पती मध्यस्थी करण्यास आला असता त्यालाही आरोपी महिलेच्या कुटुंबीयांनी मारहाण केली. याबाबत मारहाण झालेल्या महिलेने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी एका महिलेसह कुटुंबातील अन्य तीन सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
मारेगाव तालुक्यातील अनंतपूर (सुर्ला) येथे एकमेकांच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये शुल्लक कारणांवरून खटके उडत असतात. अशातच २४ मार्चला सकाळी ७ वाजता कुंदा गणेश पाचभाई (३५) ही महिला भांडे घासत असतांना खरकटे पाणी गेट समोर का फेकले म्हणून शेजारी राहणाऱ्या संगीता गजानन पारखी (४०) या महिलेने तिच्याशी जोरदार वाद घातला. वाद विकोपाला जाऊन या महिलांमध्ये चक्क फ्रीस्टाईल झाली. दोघींनीही एकमेकांचे केस ओढले. त्यातच संगीताने कुंदाचे ताकदीने केस आवळून तिला खाली पाडले. त्यानंतर तिला लाथाबुक्य्यांनी प्रचंड मारहाण केली.
संगीता कुंदाला मारहाण करीत असल्याचे पाहून कुंदाचे पती गणेश जगन पाचभाई यांनी त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु संगीताचे पती गजानन संबा पारखी (४५) व मुले अविनाश गजानन पारखी (२४) व अंकित गजानन पारखी (२२) या तिघांनी गणेश पाचभाई यांचा हात मुरडून त्यांना ढकलून दिले. त्यामुळे त्यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले. त्यानंतर दोन कुटुंबांमध्ये होत असलेली मारहाण आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करून सोडविली. मात्र पारखी पिता पुत्राने कुंदा व तिचे पती गणेश पाचभाई यांना तुम्ही यानंतर कुठेही भेटा तुम्हाला जीवानिशी ठार करतो, अशी धमकी दिली. पारखी कुटुंबाविरुद्ध याआधीही पाचभाई कुटुंबाने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली होती. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तोच राग मनात धरून पारखी कुटुंबं सतत वाद घालत असल्याचे पाचभाई कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
संगीता पारखी व तिच्या कुटुंबीयांनी मारहाण व धमकी दिल्याने भयभीत झालेल्या कुंदा गणेश पाचभाई यांनी याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी संगीता पारखी, गजानन पारखी. अविनाश पारखी, अंकित पारखी यांच्यावर बीएनएसच्या कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
No comments: