प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील भालर गावाजवळील शिव मंदिर व स्मशानभूमी दरम्यान असलेल्या गुंज नाल्यात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळच मोपेड दुचाकीही पडून असल्याने तो दुचाकीसह नाल्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर घातपाताचाही संशय व्यक्त होतांना दिसत आहे. ही घटना शुक्रवार २८ मार्चला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. महादेव अमृत बहादे (५९) असे या मृत इसमाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. मृतक महादेव बहादे हा वेकोलिच्या राजूर (ई) कोळसाखाणीत सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. पोलिस मृत व्यक्तीबद्दल आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
भालर गावाजवळून गुंज नाला वाहतो. या नाल्यात एक इसम व मोपेड दुचाकी पडून असल्याचे या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीस पडले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मृतक हा वेकोलि कर्मचारी असल्याचे कळाले. तो भालर मार्गाने जात असतांना त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले व तो पुलावरून दुचाकीसह नाल्यात पडला असावा, असा कयास वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर घातपाताचाही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या इसमाचा अपघात झाला की घातपात याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र गुंज नाल्यात दुचाकीसह इसम मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
No comments: