प्रशांत चंदनखेडे वणी
वणी यवतमाळ बायपास मार्गावरील वडगाव वाळणरस्त्याजवळ असलेल्या प्रवासी निवाऱ्यात एक वृद्ध इसम मृतावस्थेत आढळून आला. ही घटना रविवार ३० मार्चला सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हा इसम तोल जाऊन जमिनीवर पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा कयास वर्तविण्यात येत आहे. मृतदेहाजवळ काठी आढळून आल्याने हा वृद्ध इसम काठीचा आधार घेऊन चालत असावा, असा अंदाज बांधला जात आहे. अशातच शारीरिक संतुलन बिघडल्याने तोल जाऊन तो जमिनीवर पडला, आणि कुणाचीही मदत व उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. उपचाराअभावी एक दिवसापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतकाजवळ वणी ते वांजरी एसटी प्रवासाची तिकीट मिळाली असून तो तालुक्यातीलच रहिवाशी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतकची ओळख अद्याप पटली नसून पोलिस मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील तपास जमादार गजानन होडगीर करीत आहे.
No comments: